लंडन नाही, भारतातही शूट झालेला जेम्स बॉन्डचा 13 वा चित्रपट, चक्क बॉडीगार्ड बनला होता हा प्रसिद्ध अभिनेता
जेम्स बॉन्ड ही जगभरात लोकप्रिय असलेली ब्रिटिश स्पाय फिल्म फ्रँचायझी आहे. गेल्या 64 वर्षांपासून या चित्रपट मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. जेम्स बॉन्डच्या या लोकप्रिय चित्रपट मालिकेचा भारताशीही एक खास संबंध आहे.

जेम्स बॉन्ड ही जगभरात लोकप्रिय असलेली ब्रिटिश स्पाय फिल्म फ्रँचायझी आहे. गेल्या 64 वर्षांपासून या चित्रपट मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. आता या मालिकेतील 007 या प्रसिद्ध गुप्तहेराची भूमिका कोण साकारणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. दरम्यान, जेम्स बॉन्डच्या या लोकप्रिय चित्रपट मालिकेचा भारताशीही एक खास संबंध आहे. विशेष म्हणजे, राजस्थानमधील उदयपूर शहरात या मालिकेतील एका चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले होते. जाणून घेऊया या खास भारतीय कनेक्शनविषयी.
1983 मध्ये प्रदर्शित झाला होता ऑक्टोपसी
जेम्स बॉन्ड मालिकेतील 13 वा चित्रपट ऑक्टोपसी 1983 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता रोजर मूर यांनी जेम्स बॉन्डची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील काही महत्त्वपूर्ण दृश्यांचे चित्रीकरण राजस्थानमधील उदयपूर येथे करण्यात आले होते. सप्टेंबर 1982 मध्ये भारतात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती.
उदयपूरमधील 4 राजवाड्यांमध्ये शूटिंग
ऑक्टोपसी चित्रपटासाठी उदयपूरमधील 4 भव्य राजवाड्यांची निवड करण्यात आली होती. यामध्ये ताज लेक पॅलेस, मानसून पॅलेस, शिव निवास पॅलेस आणि जग मंदिर पॅलेस यांचा समावेश होता. या ऐतिहासिक वास्तूंमुळे चित्रपटातील अनेक दृश्यांना राजेशाही आणि आकर्षक पार्श्वभूमी मिळाली.
ताज लेक पॅलेसमधील लोकप्रिय सीन
चित्रपटातील एक प्रसिद्ध दृश्य ताज लेक पॅलेसच्या परिसरात चित्रित करण्यात आले होते. या दृश्यात जेम्स बॉन्ड बनावट मगरीच्या आत लपून तलाव पार करतो आणि ऑक्टोपसीच्या महालात प्रवेश करतो. याशिवाय महालाच्या आतील भागात ऑक्टोपसी आणि तिच्या सैन्याशी संबंधित काही दृश्यांचे चित्रीकरणही करण्यात आले होते.
मानसून आणि शिव निवास पॅलेसचाही वापर
चित्रपटातील खलनायक कमाल खान याचा अड्डा म्हणून मानसून पॅलेस दाखवण्यात आला होता. चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये ऑक्टोपसी आणि तिचे सैन्य कमाल खानच्या महालावर हल्ला करतात. या प्रसंगातील काही दृश्ये मानसून पॅलेसमध्ये चित्रित करण्यात आली होती. तर शिव निवास पॅलेसमध्ये मॅग्डासोबत जेम्स बॉन्डच्या कँडललाइट डिनरचा प्रसंग शूट करण्यात आला होता.
कबीर बेदी आणि विजय अमृतराजही होते चित्रपटात
ऑक्टोपसी चित्रपटात केवळ परदेशी कलाकारच नव्हे, तर भारतीय कलाकारांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या होत्या. बॉलिवूड अभिनेते कबीर बेदी यांनी कमाल खानचा अंगरक्षक गोबिंदा ही भूमिका साकारली होती. त्याचबरोबर माजी टेनिसपटू विजय अमृतराज यांनीही या चित्रपटात काम केले होते. त्यामुळे ऑक्टोपसी हा चित्रपट जेम्स बॉन्डच्या इतिहासातील भारताशी जोडलेला एक खास चित्रपट ठरला आहे.