Tulsi Vivah 2026: तुळशी विवाह कधीपासून सुरू? जाणून घ्या विवाहाचे मुहूर्त, शुभ वेळ अन् महत्त्वाचे नियम
हिंदू धर्मात तुळशी विवाहाला विशेष महत्त्व आहे. कार्तिक महिन्यातील द्वादशीपासून तुळशी विवाहाला सुरुवात होते. यंदा तुळशी विवाह कधी आहे? तुळशी विवाहाचे महत्त्व काय आणि हा विवाह लावताना कोणते नियम पाळले जातात? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी खालील माहिती जरूर वाचा.

हिंदू धर्मात तुळशी विवाहाला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशीपासून तुळशी विवाहाला सुरुवात होते. यावेळी माता तुळशीचा विवाह भगवान विष्णूंचे स्वरूप मानल्या जाणाऱ्या शाळिग्राम शिळेशी किंवा श्रीकृष्णाच्या मूर्तीशी लावला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, तुळशी विवाहानंतर हिंदू धर्मातील विवाह सोहळ्यांना सुरुवात करण्याचा काळ शुभ मानला जातो. त्यामुळे अनेक कुटुंबांमध्ये तुळशी विवाह मोठ्या भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. यंदा २१ ते २४ नोव्हेंबरदरम्यान तुळशी विवाह करता येणार आहे.
तुळशी विवाह हा केवळ एक धार्मिक विधी नसून त्यामागे भक्ती, श्रद्धा आणि पवित्र नात्याचे प्रतीक असलेली परंपरा जोडलेली आहे. माता तुळशीला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते, तर शाळिग्राम हे भगवान विष्णूंचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे या विवाहामुळे घरात सुख, समृद्धी आणि सौभाग्य नांदते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. अनेक ठिकाणी तुळशी वृंदावनाची आकर्षक सजावट करून त्याभोवती रांगोळी काढली जाते. तुळशीला साडी, दागिने आणि फुलांनी सजवून विवाहासाठी मंडपही तयार केला जातो.
तुळशी विवाह लावताना अक्षता, वरमाला, गठबंधन, सिंदूरदान आणि फेरे यांसारखे पारंपरिक विधी केले जातात. यावेळी तुळशी आणि शाळिग्राम यांची विधिवत पूजा करून मंगलाष्टके म्हटली जातात. काही ठिकाणी विवाहानंतर आरती करून प्रसादाचे वाटप केले जाते. मात्र, हा विवाह करताना पूजेची योग्य पद्धत, शुभ वेळ आणि परंपरेनुसार पाळायचे नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तुळशी विवाहाची संपूर्ण विधी, त्यामागील धार्मिक महत्त्व आणि विवाह लावताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
पंचांगानुसार, तुळशी विवाह शनिवार, 21 नोव्हेंबर ते मंगळवार 24 नोव्हेंबर या कालावधीत पार पडेल. द्वादशी तिथी हि 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:31 मिनिटांनी सुरु होईल. तर द्वादशी तिथी समाप्त 22 नोव्हेंबर रोजी पहाटे 4:56 मिनिटांनी होईल. इतर दिवशी तुळशी विवाह लावणार असाल तर सूर्यास्तानंतरची वेळ या विवाहासाठी शुभ मानली जाते. स्थानिक सूर्योदय, सूर्यास्त आणि पंचांगानुसार मुहूर्ताच्या वेळेत फरक असू शकतो. त्यामुळे आपल्या शहरातील पंचांग किंवा पुरोहितांचा सल्ला घेऊन विवाहाची वेळ निश्चित करावी.
तुळशी विवाहाचे महत्त्वाचे नियम
अक्षतांचा नियम :
शाळिग्राम किंवा भगवान विष्णुवर कधीही कच्चे तांदूळ वाहू नयेत. विष्णू पूजेत तांदळाऐवजी पांढरे किंवा पिवळे तीळ वापरावेत.
वरमाला आणि गठबंधन :
तुळशीला आणि शाळिग्रामला परस्परांचा स्पर्श करून वरमाला घालावी. दोघांचे पिवळे वस्त्र आणि चुनरी एकत्र बांधून 3 गाठी मारून गठबंधन केले जाते
सिंदूरदान आणि मंगळसूत्र :
शाळिग्रामच्या हाताचा स्पर्श करून तुळशी मातेच्या भांगेत सिंदूर भरले जाते आणि मंगलसूत्र अर्पण केले जाते.
फेरे:
लहान नारळ किंवा योग्य विधीनुसार श्रीहरी आणि माता तुलसी यांच्याभोवती प्रदक्षिणा/फेरे घेतले जातात.
