आईच्या सांगण्यावरून..; प्लास्टिक सर्जरीबद्दल जान्हवी कपूरचा खुलासा, सांगितलं मोठं सिक्रेट

अभिनेत्री जान्हवी कपूरच्या प्लास्टिक सर्जरीबद्दल बरीच चर्चा होते. या चर्चांवर अखेर तिने मौन सोडलं आहे. त्याचसोबत आई श्रीदेवी यांनी कोणता सल्ला दिला होता, याविषयीही ती मोकळेपणे व्यक्त झाली. जान्हवीने बफेलो-प्लास्टीच्या चर्चांवरही प्रतिक्रिया दिली आहे.

आईच्या सांगण्यावरून..; प्लास्टिक सर्जरीबद्दल जान्हवी कपूरचा खुलासा, सांगितलं मोठं सिक्रेट
Janhvi Kapoor
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 23, 2025 | 11:09 AM

बॉलिवूड इंडस्ट्रीत प्लास्टिक सर्जरी ही सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. आजवर असंख्य अभिनेत्रींनी सुंदर दिसण्यासाठी सर्जरी, बोटॉक्स, फिलर्स यांचा आधार घेतला आहे. त्यापैकी अभिनेत्री जान्हवी कपूरचं ब्युटी ट्रान्सफॉर्मेशन सर्वाधिक चर्चेत राहिलं. जान्हवीच्या दिसण्यावरून अनेकदा टीका झाली, तर काहींनी तिला थेट ‘प्लास्टिक’ असंही म्हटलंय. या सर्व चर्चा आणि टीकांवर ती नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाली. ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या टॉक शोमध्ये ती निर्माता-दिग्दर्शक करण जोहरसोबत पोहोचली होती. या शोमध्ये जान्हवी प्लास्टिक सर्जरीबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली.

“मला गेटकीपिंगवर (एखाद्या ट्रेंडला कोणी फॉलो करावं हे ठरवणं) विश्वास नाही. सोशल मीडियावर जेव्हा प्रत्येकाला एका विशिष्ट पद्धतीने पाहिलं जात होतं, त्यांच्या दिसण्यावरून मतं बनवली जात होती, त्यांच्याकडे एका विशिष्ट पद्धतीने पाहिलं जात होतं, तेव्हा हे सर्व होताना पाहणाऱ्या तरुणींपैकी मी खूप प्रभावी होती. मला तरुण मुलींसमोर परिपूर्णतेची ही अशी कल्पना ठेवायची नाहीये. तुम्हाला ज्या गोष्टींमधून आनंद मिळतो, त्या गोष्टी तुम्ही करा. यावर माझा खूप विश्वास आहे. मला गोष्टींबद्दल पूर्णपणे खुल्या पुस्तकासारखं वागायला आवडेल”, असं जान्हवी म्हणाली.

यावेळी जान्हवीने तिच्या ‘बफेलो-प्लास्टी’च्या चर्चांवरही उत्तर दिलं. हे उत्तर देताना तिने दिवंगत अभिनेत्री आणि आई श्रीदेवी यांनी दिलेल्या सल्ल्याचा उल्लेख केला. “माझ्या मते, मी ज्या काही गोष्टी केल्या आहेत, त्याबद्दल मी खूप हुशार, रुढीवादी आणि योग्य आहे. अर्थात, मला माझ्या आईकडून बरंच मार्गदर्शन मिळालं आणि तेसुद्धा मला इतरांसोबत शेअर करायला आवडेल. एक सावधगिरी म्हणून सांगू इच्छिते, कारण तरुण मुली अशा प्रकारचे व्हिडीओ बघात आणि मलासुद्धा बफेलो-प्लास्टी करायची आहे, असं ठरवतात आणि जर त्यात काही चुकीचं झालं, तर ती सर्वांत वाईट गोष्ट ठरू शकते. त्यामुळे पारदर्शकता महत्त्वाची आहे”, असा सल्ला जान्हवीने दिला.

बफेलो प्लास्टी म्हणजे काय?

बफेलो-प्लास्टी हा शब्द एका ठराविक सर्जरीसाठी वापरला जातो. ज्यामध्ये वरचं ओठ आणि नाक यांच्यामध्ये असलेली जागा सर्जरी करून आणखी लहान केली जाते. नाक आणि ओठ यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी बफेलो प्लास्टी केली जाते.