जावेद जाफरीच्या पत्नीची कोट्यवधींची फसवणूक; बीएमसीचे सहाय्यक आयुक्त निलंबित

अभिनेता जावेद जाफरी आणि त्याची पत्नी हबीबा जाफरी यांची जवळपास 16 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना निलंबित करण्यात आलं आहे. हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे, ते जाणून घ्या..

जावेद जाफरीच्या पत्नीची कोट्यवधींची फसवणूक; बीएमसीचे सहाय्यक आयुक्त निलंबित
जावेद जाफरी, हबीबा जाफरी
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 08, 2026 | 1:09 PM

अभिनेता जावेद जाफरी आणि त्याची पत्नी हबीबा यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांना तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे. त्यांच्यावर जावेद जाफरीची पत्नी हबीबा जाफरीची 16 कोटी 24 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. महेश पाटील यांच्या निलंबनाचे अधिकृत आदेश शुक्रवारी जारी करण्यात आले होते. त्यानंतर रविवारी 7 जून 2026 रोजी हे आदेश सोपवण्यात आले. त्यांच्याविरोधात मुंबईतील खार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल असून ते गेल्या काही दिवसांपासून फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार, महेश पाटील आणि त्यांच्या साथीदारांनी वांद्रे परिसरातील एका पुनर्विकास प्रकल्पात गुंतवणूकदारांना भरघोस परतावा आणि मोठा नफा देण्यात आमिष दाखवलं. यासाठी त्यांनी बनावट आणि खोटी कागदपत्रे तयार केली होती. खार पोलिसांनी याप्रकरणी महेश पाटील आणि इतर पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचं गांभीर्य आणि त्यात गुंतलेली मोठी रक्कम लक्षात घेता, या हाय-प्रोफाइल प्रकरणाचा तपास आता मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. तर फरार महेश पाटील आणि इतर आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शाखेची पथकं विविध ठिकाणी छापे टाकत आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण?

एप्रिल 2024 मध्ये जावेद जाफरीची पत्नी हबीबा जाफरी यांना अंधेरी इथल्या त्यांच्या बंगल्यावरील मालमत्ता करारासंदर्भात मुंबई महानगरपालिकेकडून एक नोटीस मिळाली होती. अली रझा नावाच्या एका ओळखीच्या व्यक्तीमार्फत त्यांची ओळख बीएमसीचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्याशी झाली. पाटील यांनी आधी त्यांना टॅक्स-सेटलमेंटचं आश्वासन दिलं. नंतर वांद्रे पश्चिम इथल्या ‘न्यू कमलकुंज’ या व्यावसायिक प्रकल्पात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. नामांकित बांधकाम व्यावसायिकांशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या निशित पटेल यांनी सांगितलं की, या प्रकल्पात आधीच 150 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. डिसेंबर 2025 पर्यंत व्यावसायिक जागा वापरात येईल आणि त्यासाठी एका परदेशी बँकेसोबत पूर्व-भाडेकरारही झाल्याचं त्यांनी आश्वासन दिलं.

अनेकदा घरी जाऊन दाखवली बनावट कागदपत्रे

आरोपी महेश पाटील यांनी जावेद जाफरीच्या घरी अनेकदा भेट देऊन त्यांना प्रकल्पाचे नकाशे, लेटरहेड्स, बनावट रुचि पत्रे, तसंच फोटो आणि व्हिडीओ दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. यावर विश्वास ठेवून जावेद जाफरीच्या पत्नीने पैसे गुंतवण्यासाठी आपले फ्लॅट्स आणि बंगले विकले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रक्कम पूजान टेक्नॉलॉजीस, उदित ट्रेडर्स, एशियन फूड्स आणि आरपीपीएल मल्टी ट्रेड यांसह अनेक कंपन्यांच्या खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आली होती.

मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने आधीच निशित पटेलला बेड्या ठोकल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यावर निशित पटेलने आरोप केले होते. महेश पाटील यांच्या सांगण्यावरून मी पैसे जमा केले, असा दावा करणाऱ्या निशितवर कारवाई झाली आहे. एका मोठ्या फसवणुकीच्या प्रकरणात निशित पटेलचा सहभाग असल्याचं सिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी प्राथमिक तपास केला आणि त्यानंतर त्याला अटक केली.

Follow Us