
लग्नाच्या 14 वर्षांनंतर प्रसिद्धी टीव्ही अभिनेता जय भानुशाली आणि माही विज यांनी घटस्फोट घेतला. दोघांच्या या निर्णयाने चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. आता घटस्फोट जाहीर केल्याच्या अवघ्या काही दिवसांनंतर माहीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. माहीने तिच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीसोबतचा फोटो पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. इतकंच नव्हे तर तिने या पोस्टमध्ये ‘आय लव्ह यू’ असं लिहित हृदयाचे इमोजी शेअर केले आहेत. त्याचसोबत माहीने पोस्टवरील कमेंट सेक्शनसुद्धा बंद केलं आहे, जेणेकरून त्यावर कोणी काहीच कमेंट करू शकणार नाही.
माही विजने तिचा मित्र नदीमला केक भरवतानाचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, ‘मी मनापासून निवडलेल्या माणसाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. एक असा माणूस जो मी काहीही न बोलता माझं ऐकतो, जो मला त्याच्या गरजेसाठी नाही तर त्याच्या इच्छेनुसार पाठिंबा देतो. तू माझा कुटुंब आहेस. मला तुझ्यासोबत सुरक्षित वाटतं. तू माझा कायमचा साथीदार आहेत. तू फक्त माझा सर्वांत चांगला मित्रच नाहीस तर माझा आधार, माझी शक्ती, माझं घर आहेस.’
माहीने या पोस्टमध्ये पुढे म्हटलंय, ‘मी दु:खी असो, आनंदी असो, भावूक असो किंवा अपूर्ण असो.. तू मला प्रत्येक परिस्थितीत स्वीकारतोस. कधीकधी आपण एकमेकांवर रागावतो, भांडतो, कधीकधी दिवसभर बोलत नाही. पण ही शांतता नेहमी एकाच ठिकाणी येऊन संपते.. ते म्हणजे आपली मैत्री. कारण आपल्याला दोघांनाही माहीत आहे की नदीम आणि माही एक आहेत. आपले आत्मे एकमेकांशी अशा प्रकारे जोडलेले आहेत, की शब्दांत वर्णन करता येत नाही. आयुष्य नेहमीच सोपं नव्हतं, पण तुझ्यासोबत राहिल्याने सर्वकाही हलकं आणि चांगलं होतं. जेव्हा कमी कमकुवत होते, तेव्हा तू माझा हात धरतोस, जेव्हा मी स्वत:वर विश्वास ठेवायला विसरते, तेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेवतोस. नदीम.. आय लव्ह यू. तू माझं मन, माझं घर, माझं कुटुंब आहेस.. आज आणि नेहमीच.’
माहीच्या या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय. या पोस्टवर नेटकऱ्यांनी काही प्रतिक्रिया देण्याआधीच तिने कमेंट सेक्शन बंद ठेवलंय. त्यामुळे नेटकऱ्यांना तिच्या या पोस्ट कमेंट करता येणार नाही.