दोन वर्षांत तुटलं पहिलं लग्न, चाळिशीत दुसऱ्यांना बांधली लग्नगाठ; जेनिफर विंगेट प्रेमाबद्दल म्हणाली..
अभिनेत्री जेनिफर विंगेटने वयाच्या चाळिशीत दुसरं लग्न केलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती या लग्नाविषयी आणि आयुष्यात पुन्हा प्रेम परतण्याविषयी मोकळेपणे भाष्य केलं. जेनिफरने याआधी करण सिंह ग्रोवरशी लग्न केलं होतं.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. वयाच्या 41व्या वर्षी तिने सिंगापूरस्थित व्यावसायिक विल्यम इश्माएल याच्याशी लग्न केलं. युकेमध्ये कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत झालेलं हे लग्न सुरुवातीला अतिशय खासगी ठेवण्यात आलं होतं. मात्र, नंतर जेनिफरने स्वतः लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. आता लग्नानंतर पहिल्यांदाच तिने या खासगी सोहळ्याबाबत आणि प्रेमाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं आहे. जेनिफरच्या लग्नाची माहिती अचानक समोर आल्यानंतर अनेक चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यामुळे तिने तिचं लग्न गुपचूप केलं का, असा प्रश्नही उपस्थित झाला. यावर प्रतिक्रिया देताना जेनिफरने हा विवाह कधीच सीक्रेट ठेवला नव्हता, असं स्पष्ट केलं.
“हे सीक्रेट होतं का? सगळं तर समोर होतं,” असं म्हणत तिने या चर्चेला उत्तर दिलं. सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्ती असल्यामुळे वैयक्तिक आयुष्य खासगी ठेवणं किती कठीण आहे, याबद्दलही तिने भाष्य केलं. प्रत्येकाला सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घ्यायचं असतं, त्यामुळे आपल्याकडे सगळं लपवून ठेवण्याचा पर्याय नसतो, असं जेनिफरने सांगितलं. दुसऱ्यांदा लग्न केल्यानंतर जेनिफरने प्रेमाबद्दलही तिची भूमिका स्पष्ट केली.
View this post on Instagram
जेनिफरच्या मते, तिला प्रेमाचा अर्थ समजायला लागल्यापासून तिने नेहमीच प्रेमावर विश्वास ठेवला आहे. मात्र, तिच्यासाठी प्रेम म्हणजे केवळ जोडीदारामधील रोमँटिक नातं नाही. कुटुंब आणि मित्रांकडून मिळणारं प्रेमही तितकंच महत्त्वाचं आहे, असं ती म्हणाली. वय वाढत गेल्यानंतर मित्र आणि कुटुंबीयांचं प्रेम किती महत्त्वाचं आहे, याची जाणीव अधिक होते, असंही जेनिफरने सांगितलं. आयुष्यात चढ-उतार येत राहतात, नात्यांमध्ये मतभेद होतात; मात्र हेच आयुष्याचा भाग असल्याचं तिचं मत आहे.
पहिलं लग्न अवघ्या दोन वर्षांत तुटलं
जेनिफर विंगेटचं याआधी अभिनेता करण सिंह ग्रोवरसोबत लग्न झालं होतं. दोघांनी 2012 मध्ये लग्न केलं, मात्र हे नातं फार काळ टिकलं नाही. 2014 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर जेनिफरने तिच्या कामावर लक्ष केंद्रित केलं आणि टीव्ही तसंच ओटीटी क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली.
जेनिफरने लग्नानंतर तिच्या करिअरवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं यापूर्वी स्पष्ट केलं आहे. तिचा पती भारतात राहत नसल्यामुळे काम आणि वैवाहिक आयुष्याचा समतोल साधण्यासाठी तिला वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवास करावा लागणार असल्याचं तिने सांगितलं होतं.
