भर कार्यक्रमात आमिरच्या पूर्व पत्नींबद्दल मुलाची ‘ती’ कमेंट; आता होतोय पश्चात्ताप

अभिनेता आमिर खान आणि त्याचा मुलगा जुनैद खान हे 'बिग बॉस 18'च्या ग्रँड फिनालेमध्ये उपस्थित होते. यावेळी जुनैदने त्याच्या वडिलांच्या दोन्ही पूर्व पत्नींबाबत एक कमेंट केली होती. त्यावरून आता त्याने पश्चात्ताप व्यक्त केला आहे.

भर कार्यक्रमात आमिरच्या पूर्व पत्नींबद्दल मुलाची ती कमेंट; आता होतोय पश्चात्ताप
आमिर खान-जुनैद खान, किरण राव-रिना दत्ता
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 30, 2025 | 1:27 PM

अभिनेता आमिर खान आणि त्याचा मुलगा जुनैद खान हे नुकतेच ‘बिग बॉस 18’च्या ग्रँड फिनालेमध्ये पोहोचले होते. यावेळी सूत्रसंचालक सलमान खानसोबत दोघांचा मजेशीर संवाद पहायला मिळाला. आपल्या ‘लवयापा’ या चित्रपटाचं प्रमोशन करताना जुनैदने आमिर आणि सलमान यांच्यासोबत गेम खेळायचं ठरवलं होतं. या गेमनुसार आमिर आणि सलमान एकमेकांचा मोबाइल फोन तपासत होते. त्याचवेळी जुनैदने त्याच्या वडिलांच्या दोन्ही पूर्व पत्नींसंदर्भात एक कमेंट केली. बोलण्याच्या ओघात जुनैदने ही कमेंट केली असली तरी त्याचा आता त्याला पश्चात्ताप होत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जुनैदने हा पश्चात्ताप व्यक्त केला.

‘बॉलिवूड बबल’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत जुनैद म्हणाला, “कदाचित तशा पद्धतीने कमेंट करायची ती जागा नव्हती. ते दोघं (आमिर खान, सलमान खान) खूप मोठे अभिनेते आहेत. त्यामुळे मी त्यांच्यासमोर तसं वागायला पाहिजे नव्हतं, असं मला वाटतं. ते दोघं 40 वर्षांपासून या इंडस्ट्रीत आहेत आणि दोघांचा स्वभाव खूप चांगला आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर मी अशी कमेंट करणं चुकीचं होतं. मी स्वत:ला सावरलं पाहिजे होतं.”

नेमकं काय घडलं होतं?

जुनैदने सांगितलेला खेळ खेळण्यास आधी सलमान नकार देतो. “मला हा खेळ खेळायचा नाही”, असं तो म्हणतो. त्यावर आमिर त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा सलमान मस्करीत त्याला म्हणतो, “सोड.. तुझं सगळं व्यवस्थित आहे. तू दोन वेळा लग्न केलंस, तुला मुलंबाळं आहेत. माझ्या आयुष्यात यापैकी काहीच नाहीये.” या गमतीशीर संवादानंतर अखेर सलमान त्याचा फोन आमिरच्या हातात देतो आणि त्याचा फोन स्वत:च्या हातात घेतो. आमिरचा फोन तपासताना सलमान त्याला म्हणतो, “तुझी कोणी नवीन गर्लफ्रेंड आहे का?” त्यावर आमिर सांगतो की, “माझा फोन बघ, मग तुला उत्तर मिळेल.”

आमिर आणि सलमान एकमेकांचा फोन बघून मस्करी करत असतानाच जुनैदच्या एका वक्तव्याने उपस्थितांमध्ये हशा पिकतो. आमिरचा फोन हातात घेऊन सलमान म्हणतो, “मला तुझ्या फोनमध्ये काय दिसणार आहे? एकतर रिना किंवा किरणच तुला मेसेज करतील.” हे ऐकून आमिरचा मुलगा जुनैद म्हणतो, “मग दोन-दोन पूर्व पत्नींच्या शिव्या तुम्हाला वाचायला मिळतील.” यावर सर्वजण हसू लागतात.

आमिर खानने 1986 मध्ये रिना दत्ताशी पहिलं लग्न केलं. या दोघांना आयरा आणि जुनैद ही दोन मुलं आहेत. 2002 मध्ये आमिर आणि रिनाने घटस्फोट घेतला. त्याच्या तीन वर्षांनंततर 2005 मध्ये त्याने किरण रावशी दुसरं लग्न केलं. किरण आणि आमिर यांना आझाद हा मुलगा आहे. लग्नाच्या 15 वर्षांनंतर आमिर आणि किरणसुद्धा विभक्त झाले. 2021 मध्ये दोघांनी घटस्फोट जाहीर केला होता. घटस्फोटानंतरही आमिरचं त्याच्या दोन्ही पूर्व पत्नींसोबत मैत्रीपूर्ण नातं असल्याचं पहायला मिळतं. पाणी फाऊंडेशनच्या कामासाठी हे तिघं अनेकदा एकत्र येतात.