
बॉलिवूडमध्ये असे अनेक कुटुंब आहेत, ज्यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. कधी भावंडांमध्ये, तर कधी बापलेकामध्ये.. हे वाद चाहत्यांपासूनही लपलेले नाहीत. अशाच वादामुळे सध्या दिग्गज अभिनेते कबीर बेदी चर्चेत आले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी त्यांच्या मुलीशी अबोला धरला होता. कबीर बेदी यांची मुलगी पूजा बेदीसुद्धा बॉलिवूड अभिनेत्री आहे. परंतु तिला तिच्या करिअरमध्ये फारसं यश मिळालं नाही. या दोघांमध्ये संपत्तीवरून वाद सुरू होता आणि त्यामुळेच ते एकमेकांशी बोलत नव्हते, अशी चर्चा होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कबीर यांनी पहिल्यांदा मुलीसोबतच्या वादावर मौन सोडलं आहे.
आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत कबीर बेदी यांना त्यांच्या मुलीसोबतच्या वादावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, “प्रत्येक नात्यात कधी ना कधी समस्या येतातच. मी त्या कारणांचा पुनरुच्चार करु इच्छित नाही. अर्थातच, आमच्यात काही गैरसमज होते. तिने काही कामं अशी केली होती, ज्यामुळे मी त्रस्त झालो होतो. मीसुद्धा अशी काही कामं केली असतील, ज्यामुळे ती वैतागली असेल. महत्त्वाची गोष्ट ही आहे की या मतभेदांमुळे आम्ही दोन ते तीन वर्षे वेगळे होतो. आता तो वाद संपुष्टात आला आहे. आमचं नातं आता अधिक मजबूत झालं आहे. वडील आणि मुलगी म्हणून आमचं नातं आता चांगलं झालं आहे. मला तिच्या कामावर अभिमान आहे. आमच्यात आता खूप प्रेम आणि सन्मान आहे.”
पूजा बेदी ही कबीर बेदी आणि प्रोतिमा बेदी यांची मुलगी आहे. कबीर यांनी नंतर परवीन दुसांझशी लग्न केलं होतं. या लग्नामुळे त्यांचे मुलीसोबत मदभेद निर्माण झाले होते का, असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “कारण जे काही असेल, त्यावर नको बोलुयात. फक्त परवीन हे एकमेव कारण नव्हतं. इतरही बरेच विषय होते, ज्यामुळे आमच्यात वाद झाले आणि मतभेद निर्माण झाले. या गोष्टींशी परवीनचं काही घेणं-देणं नाही. आनंदाची गोष्ट ही आहे की आता सर्वकाही ठीक झालंय. मी पूजा आणि परवीन.. या दोघींवर प्रेम करतो.”
या मुलाखतीत कबीर बेदी त्यांच्या चौथ्या पत्नीबद्दलही मोकळेपणे व्यक्त झाले. “आमचं नातं खूप चांगलं आहे. आम्ही एकमेकांचा आदर करतो. परवीनचं एक वेगळं करिअर आहे. ती एक निर्माता आहे. तिच्याकडेही बरेच प्रोजेक्ट्स आहेत. पूजाचं एक वेगळं करिअर आहे. दोघी आपापल्या आयुष्यात खुश आहेत”, असं त्यांनी स्पष्ट केलं.