एकच गाणं एवढं गाजलं की दिग्दर्शकाने काढले थेट 4 मराठी सिनेमे; 16 वर्षांपासून तरुणाईच्या प्ले-लिस्टवर टॉपला

2010 हे वर्ष एका मराठी चित्रपटाने चांगलंच गाजवलं होतं. तो चित्रपट आजही अनेकांना भूरळ घालतो. एकदा सिनेमा सुरु झाला की आपोआप प्रेक्षक सिनेमा पाहू लागतो. या सिनेमाची गाणीही प्रचंड हिट आहेत.

एकच गाणं एवढं गाजलं की दिग्दर्शकाने काढले थेट 4 मराठी सिनेमे; 16 वर्षांपासून तरुणाईच्या प्ले-लिस्टवर टॉपला
Marathi Romantic Song
Image Credit source: social media
| Updated on: Oct 29, 2026 | 11:14 PM

मुंबईची हटके शैली आणि पुण्याचा ठसकेबाज बाणा… या दोन विरुद्ध संस्कृतींना प्रेमाच्या नाजूक बंधात गुंफणारं एक गाणं आजही मराठी मनावर अधिराज्य गाजवत आहे. २०१० मध्ये रिलीज झालेल्या ‘मुंबई पुणे मुंबई’ या चित्रपटातील ‘कधी तू रिमझिम झरणारी बरसात’ या रोमँटिक गाण्याने डिजिटल प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा नवा इतिहास रचला आहे. यूट्यूबवर या गाण्याने तब्बल ३३ मिलियनहून अधिक व्ह्यूजचा आकडा पार केला असून, तब्बल १६ वर्षांनंतरही या गाण्याची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही.

गौतम आणि गौरीची तीच भन्नाट केमिस्ट्री

दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्या कल्पकतेतून साकारलेली गौतम (स्वप्नील जोशी) आणि गौरीची (मुक्ता बर्वे) जोडी पडद्यावर आली आणि प्रेक्षकांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतलं. अनोळखी म्हणून पुण्याच्या गल्लीबोळात भेटलेल्या या दोघांची नोकझोक आणि हळुवारपणे फुलणारं प्रेम या गाण्यातून ज्या सुंदरतेने मांडलं गेलं, ते थेट प्रेक्षकांच्या काळजात घर करून गेलं. या एका गाण्याच्या अफाट लोकप्रियतेमुळे आणि पहिल्या भागाच्या यशामुळे ‘मुंबई पुणे मुंबई’ची एक यशस्वी फ्रँचायझीच आकारास आली.

Loading...

४ थ्या भागाची आतुरता अन्‌ जुन्या आठवणींना उजाळा

पहिल्या भागात प्रेमाची सुरुवात, दुसऱ्या भागात लग्नाची गडबड आणि तिसऱ्या भागात नव्या आयुष्याची (आई-बाबा होण्याची) चाहूल असा प्रवास दाखवल्यानंतर, गेल्या वर्षी (२०२५) ‘मुंबई पुणे मुंबई ४’ ची घोषणा झाली. या चौथ्या भागात आता या जोडप्याच्या आयुष्यात काय नवीन ड्रामा आणि वळण येणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच, ३३ मिलियन व्ह्यूजचा हा टप्पा गाठून ‘कधी तू…’ गाण्याने चाहत्यांच्या जुन्या रोमँटिक आठवणी पुन्हा ताज्या केल्या आहेत.

 

शब्दांची जादू अन् अविनाश-विश्वजीतचं संगीत

सतीश राजवाडे आणि श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलेले अर्थपूर्ण शब्द, हृषिकेश रानडेचा रेशमी आवाज आणि अविनाश-विश्वजीत या जोडगोळीचं सुमधुर संगीत… या त्रिवेणी संगमाने हे गाणं मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय ‘लव्ह अँथम’ बनवलं आहे. आजच्या काळातही रिमझिम पावसाच्या प्रवासात किंवा शांत संध्याकाळी हे गाणं प्रत्येक प्रेमीयुगुलाच्या प्ले-लिस्टमध्ये टॉपला असतं.

गाण्याचे बोल

कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चम चम करणारी चांदरात
कधी तू …… कोसळत्या धारा थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात …
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात ….

कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चम चम करणारी चांदरात

कधी तू अंग अंग मोहरणारी
आसमंत दरवळणारी रातराणी वेड्या जंगलात
कधी तू हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यात
कधी तू रिमझिम झरणारी बरसात

कधी तू …… कोसळत्या धारा थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात …
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात ….

जरी तू कळले तरी ना कळणारे दिसले तरी ना दिसणारे
विरणारे मृगजळ एक क्षणात
तरी तू मिटलेल्या माझ्या पापण्यात

कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चम चम करणारी चांदरात

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us