‘तुम्ही इमर्जन्सी हा चित्रपट पहायला हवा’; कंगना यांचं ऐकताच प्रियंका गांधींनी दिलं असं उत्तर

कंगना राणौत यांच्या 'इमर्जन्सी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला असून येत्या 17 जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रियंका गांधी यांना चित्रपट पाहण्यास सांगितल्याचं कंगना यांनी खुलासा केला.

तुम्ही इमर्जन्सी हा चित्रपट पहायला हवा; कंगना यांचं ऐकताच प्रियंका गांधींनी दिलं असं उत्तर
Priyanka Gandhi and Kangana Ranaut
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 08, 2025 | 3:14 PM

अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांच्या आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या 17 जानेवारी रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 1975 ते 1977 दरम्यान 21 महिन्यांच्या कालावधीवर आधारित आहे, जेव्हा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाला अंतर्गत आणि बाह्य धोक्यांचा हवाला देऊन देशभराता आणीबाणी जाहीर केली होती. आता हा चित्रपट पाहण्यासाठी प्रियंका गांधी यांना निमंत्रण दिल्याचं कंगना यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलंय. कंगना यांच्यासोबतच चित्रपटात अनुपम खेर, श्रेयस तळपदे, विशाक नायर, महिमा चौधरी, सतीश कौशिक, मिलिंद सोमण यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

IANS ला दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाल्या, “मी खरंतर संसदेत प्रियंका गांधी यांना भेटले आणि पहिली गोष्ट मी त्यांना हीच सांगितली की, ‘तुम्ही इमर्जन्सी हा चित्रपट पहायला हवा.’ त्या खूपच दयाळू स्वभावाच्या होत्या. हो मी कदाचित बघेन, असं त्यांनी मला सांगितलं. त्यामुळे बघुयात की त्यांना हा चित्रपट बघायचा आहे का? माझ्या मते या चित्रपटात देशातील एका अत्यंत संवेदनशील काळाचं आणि व्यक्तिमत्त्वाचं अत्यंत समजूतदारपणे चित्रण करण्यात आलं आहे. श्रीमती गांधींना मोठ्या सन्मानाने चित्रित करण्यासाठी मी खूप काळजी घेतली आहे. जेव्हा मी खूप संशोधन करायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल खूप साहित्य उपलब्ध होतं. मग ते त्यांच्या पतीसोबतचं नातं असो किंवा अनेक मित्र किंवा वादग्रस्त समीकरणे असो.”

“मला स्वत:ला वाटतं की प्रत्येक व्यक्तीबाबत बरंच काही असतं. जेव्हा स्त्रियांचा विचार येतो तेव्हा विशेषत: त्यांचं समीकरण सभोवतालच्या पुरुषांच्या तुलनेत कमी केलं जातं आणि अर्थातच खळबळजनक घटनांबाबतही. खरंतर बहुतेक वादग्रस्त माहितीच होती परंतु मी त्यांना अत्यंत सन्मानाने आणि संवेदनशीलतेने चित्रित केलंय. मला वाटतं की प्रत्येकाने हा चित्रपट पाहिला पाहिजे. आणीबाणीच्या काळात घडलेल्या काही अत्यंत विलक्षण गोष्टींशिवाय आणि इतर गोष्टींव्यतिरिक्त, मला वाटतं की त्या खूप प्रिय होत्या आणि ती गोष्ट समोर आली पाहिजे. तीन वेळा पंतप्रधान होणं हा विनोद नाही, त्यांच्यावर प्रेम केलं गेलं”, असं कंगना पुढे म्हणाल्या.