Kantara Chapter 1 OTT: थिएटरनंतर आता ओटीटीवर ‘कांतारा : चाप्टर 1’; यादिवशी होणार स्ट्रीम

'कांतारा : चाप्टर 1'च्या ओटीटी रिलीजविषयी प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. त्याविषयची महत्त्वपूर्ण माहिती आता समोर आली आहे. ऋषभ शेट्टीचा हा ब्लॉकबस्टर चित्रपट कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार, ते जाणून घ्या..

Kantara Chapter 1 OTT: थिएटरनंतर आता ओटीटीवर कांतारा : चाप्टर 1; यादिवशी होणार स्ट्रीम
kantara chaper 1
Image Credit source: Instagram
Updated on: Oct 17, 2025 | 12:45 PM

कन्नड सुपरस्टार ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा : चाप्टर 1’ने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 670 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. 2 ऑक्टोबर रोजी दसरा आणि गांधी जयंतीच्या सुट्टीच्या दिवशी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. कन्नडसोबतच तमिळ, मल्याळम, तेलुगू, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्येही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय. एकीकडे थिएटरमध्ये ‘कांतारा : चाप्टर 1’चे शोज हाऊसफुल होत असताना दुसरीकडे प्रेक्षक त्याच्या ओटीटी रिलीजचीही प्रतीक्षा करत आहेत. या चित्रपटाच्या ओटीटी स्ट्रीमिंगबद्दल आता महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

एका रिपोर्टनुसार, ‘कांतारा : चाप्टर 1’ हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे. प्राइम व्हिडीओने ऋषभ शेट्टीच्या या चित्रपटाचे डिजिटल राइट्स विकत घेतले आहेत. परंतु याबाबतची अधिकृत घोषणा त्यांनी केली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल 125 कोटी रुपये मोजून प्राइम व्हिडीओने हे डिजिटल राइट्स घेतले आहेत.

ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा : चाप्टर 1’ हा चित्रपट 2025 या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा कन्नड चित्रपट ठरला आहे. या यादीत पहिल्या स्थानावर अजूनही यशचा ‘केजीएफ 2’ हा चित्रपट आहे. ट्रेड रिपोर्ट्सनुसार, ओटीटीवर येत्या 30 ऑक्टोबर रोजी ‘कांतारा : चाप्टर 1’ स्ट्रीम होऊ शकतो. सर्वसामान्यपणे, एखादा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्याच्या चार आठवड्यांनंतर तो ओटीटीवर येतो. परंतु ‘कांतारा : चाप्टर 1’च्या हिंदी व्हर्जनसाठी प्रेक्षकांना आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण सर्वांत आधी कन्नड, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषांमध्ये ही चित्रपट ओटीटीवर येणार आहे. त्यानंतर जवळपास 8 आठवड्यांनी हिंदी व्हर्जन ओटीटीवर स्ट्रीम होईल.

‘कांतारा: चाप्टर 1’मध्ये ऋषभ शेट्टीसोबत रुक्मिणी वसंत, जयराम, गुलशन देवैया आणि प्रमोद शेट्टी यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट जगभरात कन्नड, हिंदी, तेलुगू, मल्याळम, तमिळ, बंगाली आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित झाला आहे. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कांतारा’चा हा प्रीक्वेल आहे. कांताराची सुरुवात कशी झाली, दैव कोलाची प्रथा कधीपासून सुरू झाली, याची काल्पनिक कथा या प्रीक्वेलमध्ये दाखवण्यात आली आहे.