मित्राच्या मेहंदी कार्यक्रमात ‘कांतारा’ फेम अभिनेत्याचं निधन; 33 व्या वर्षी आला हार्ट अटॅक

ऋषभ शेट्टीच्या कांतारा या चित्रपटात भूमिका साकारलेला अभिनेता राकेश पुजारीचं हार्ट अटॅकने निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. एका मित्राच्या मेहंदी कार्यक्रमात त्याला अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यानंतर तो तिथेच कोसळला.

मित्राच्या मेहंदी कार्यक्रमात कांतारा फेम अभिनेत्याचं निधन; 33 व्या वर्षी आला हार्ट अटॅक
actor Rakesh Poojary
Image Credit source: Instagram
| Updated on: May 12, 2025 | 3:25 PM

कन्नड आणि तुलू अभिनेता राकेश पुजारीचं सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. तो 33 वर्षांचा होता. उडुपी जिल्ह्यात एका मित्राच्या मेहंदी कार्यक्रमात तो गेला होता. तिथेच त्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. निधनापूर्वी राकेशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये मेहंदी कार्यक्रमातील फोटो पोस्ट केला होता. त्याचसोबत त्याने बहिणीच्या वाढदिवसानिमित्त तिला शुभेच्छा देणारीही पोस्ट लिहिली होती. राकेशच्या निधनानंतर त्याने पोस्ट केलेले हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राकेशने ‘कॉमेडी खिलाडिगालू 3’ या शोचं विजेतेपदही जिंकली होतं.

‘डेक्कन हेराल्ड’ने दिलेल्या वृत्तानुसार, राकेश मियारमधील त्याच्या एका मित्राकडे गेला होता. मित्राच्या मेहंदीच्या कार्यक्रमातच त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला लगेच जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. कार्डिअॅक अरेस्टमुळे राकेशचं निधन झाल्याचं कळतंय. याप्रकरणी कर्काला शहर पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राकेशच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

राकेशने ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा: चाप्टर 1’मध्ये भूमिका साकारली होती. मित्राच्या मेहंदी कार्यक्रमाला जाण्यापूर्वी 11 मे रोजी त्याने आणखी एका चित्रपटासाठी शूटिंग केलं होतं. या चित्रपटात राकेश अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत होता. मेहंदी कार्यक्रमात कार्डिअॅक अरेस्टने कोसळण्यापूर्वी राकेशने थकवा जाणवत असल्याचं म्हटलं होतं.

2020 मध्ये ‘कॉमेडी खिलाडिगालू 3’ हा शो जिंकल्यानंतर राकेश कर्नाटकात लोकप्रिय झाला होता. त्याआधी 2014 मध्ये त्याने ‘कडले बाजिल’ या तुलू शोमध्येही भाग घेतला होता. त्याने कन्नड आणि तुलू चित्रपटांमध्ये काम केलंय. ‘अम्मर पोलीस’, ‘उमिल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने भूमिका साकारल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच ‘कांतारा 2’ या चित्रपटाच्या सेटवर ज्युनिअर आर्टिस्ट एम. एफ. कपिलने आपले प्राण गमावल्याची बातमी समोर आली होती. 33 वर्षीय कपिलचं निधन हे नदीत पोहताना झालं होतं. नंतर निर्मात्यांनी हे स्पष्ट केलं की ही घटना चित्रपटाच्या सेटवर किंवा शूटिंगदरम्यान झाली नव्हती. शूटिंग संपल्यानंतर नदीत पोहताना ही घटना घडल्याचं त्यांनी सांगितलं. ‘कांतारा 2’संदर्भात याआधीही अपघाताची बातमी समोर आली होती. ज्युनिअर कलाकारांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाल्याची माहिती होती. त्यानंतर निर्मात्यांकडून स्पष्ट करण्यात आलं की शूटिंगच्या ठिकाणापासून जवळपास वीस किलोमीटर अंतरावर एक किरकोळ अपघात झाला होता. त्या बसमध्ये कांताराच्या टीममधील काही सदस्य होते. सुदैवाने यात कोणालाही गंभीर दुखापत झाली नव्हती.