Kantara Chapter 1 : ‘कांतारा : चाप्टर 1’ने अवघ्या 7 दिवसांत पहिल्या भागाचं लाइफटाइम कलेक्शन केलं पार

Kantara Chapter 1 Collection : दसऱ्याच्या मुहूर्तावर कन्नड सुपरस्टार ऋषभ शेट्टीचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'कांतारा : चाप्टर 1' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने अवघ्या सात दिवसांत बक्कळ कमाई केली आहे.

Kantara Chapter 1 : कांतारा : चाप्टर 1ने अवघ्या 7 दिवसांत पहिल्या भागाचं लाइफटाइम कलेक्शन केलं पार
कांतारा- चाप्टर 1
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 09, 2025 | 9:57 AM

दसरा आणि गांधी जयंतीच्या सुट्टीचं औचित्य साधून 2 ऑक्टोबर रोजी ‘कांतारा : चाप्टर 1’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या अवघ्या सात दिवसांत या चित्रपटाने कमाईचा 300 कोटींचा टप्पा पार केला असून 400 कोटींकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे. विशेष म्हणजे ‘कांतारा : चाप्टर 1’ने पहिल्या आठवड्यातच त्याच्या पहिल्या भागाच्या लाइफटाइम कलेक्शनचा आकडा पार केला आहे. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कांतारा’ या चित्रपटाने भारतात 290 कोटी रुपयांची कमाई केली होती. मूळ कन्नड भाषेतील या चित्रपटाला हिंदीतही जबरदस्त प्रतिसाद मिळतोय.

या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 61.85 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर दुसऱ्या दिवशी 45.4 कोटी रुपयांचा कमाई झाली होती. तिसऱ्या दिवशी 55 कोटी रुपये आणि सर्वाधिक कमाई चौथ्या दिवशी म्हणजेच रविवारी झाली. आता सातव्या दिवसाच्या कमाईचाही आकडा समोर आला आहे. ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार, सातव्या दिवशी या चित्रपटाने जवळपास 15.42 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या हिशोबाने आतापर्यंत एकूण कमाईचा आकडा 306.42 कोटी रुपये होतात.

‘कांतारा : चाप्टर 1’ची आतापर्यंतची कमाई-

  • पहिला दिवस- 61.85
  • दुसरा दिवस- 45.4
  • तिसरा दिवस- 55
  • चौथा दिवस- 63
  • पाचवा दिवस- 31.5
  • सहावा दिवस- 34.25
  • सातवा दिवस- 15.42
  • एकूण- 306.42

‘होम्बाले फिल्म्स’ बॅनरअंतर्गत निर्मित झालेला हा चित्रपट ‘कांतारा’चा प्रीक्वेल आहे. यामध्ये ऋषभ शेट्टीसोबतच रुक्मिणी वलंत, जयराम, गुलशन देवैया आणि प्रमोद शेट्टी यांच्या मुख्य भूमिका आहेत. पहिल्या भागातील घटनांच्या एक हजार वर्षापूर्वी जे घडलं होतं, त्यावर आधारित या प्रीक्वेलची कथा आहे.

‘कांतारा : चाप्टर वन’ या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना आणखी खोलवर घेऊन जाते आणि अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं देते, अशी पहिली प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिली आहे. ‘पहिल्या भागात उपस्थित झालेले सर्व प्रश्न दुसऱ्या भागात स्पष्ट करण्यात आले आहेत’, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय. याशिवाय चित्रपटाचं संगीत, पार्श्वसंगीत, छायांकन आणि व्हीएफएक्स यांचंही विशेष कौतुक होत आहे. या चित्रपटातील भव्य-दिव्य सीन्सचं आणि एकंदरीत थीमचं प्रेक्षकांनी कौतुक केलंय.