पंजुर्ली, गुलिगा, ब्रह्मराक्षस..; ‘कांतारा’तील क्षेत्रपाल, गण भारताच्या अनेक गावांत आजही अस्तित्वात, लोककथा काय?

लोक कथा, लोक परंपरा, पौराणिक कथा यांच्याशी संबंधित चित्रपट सध्या विशेष चर्चेत आहेत. असाच एक चित्रपट म्हणजे 'कांतारा'. या चित्रपटातून पंजुर्ली आणि गुलिगा यांसारखे दैव प्रकाशझोतात आले. देशभरातील विविध गावांमध्ये अशा अनेक देवतांची आख्यायिका आहे.

पंजुर्ली, गुलिगा, ब्रह्मराक्षस..; कांतारातील क्षेत्रपाल, गण भारताच्या अनेक गावांत आजही अस्तित्वात, लोककथा काय?
Kantara
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 10, 2025 | 2:32 PM

एखाद्या चित्रपटाच्या कथेशी नाळ प्रेक्षकांशी जोडली गेली, की तो बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरायला फार वेळ लागत नाही. प्रेक्षकांना नेमकं हवंय तरी काय, असा प्रश्न सतत निर्माते-दिग्दर्शकांकडून विचारला जातो. तर प्रेक्षकांचा एक मोठा वर्ग वर्षानुवर्षांपासूनच्या लोककथा, गावागावातील प्रचलित कथा, पिढ्यानपिढ्यांपासून सांगितलेल्या गेलेल्या काल्पनिक कथा यांच्याशी जोडला गेला आहे. म्हणूनच जेव्हा ‘मुंज्या’ ‘कांतारा’, ‘दशावतार’ यांसारखे चित्रपट प्रदर्शित होतात, तेव्हा हाच प्रेक्षकवर्ग त्यांना डोक्यावर उचलून घेतो. भारत हा विविधतेचा देश आहे आणि या देशातील प्रत्येक गावागावात एक तरी कथा दडलेली आहे. एखादा शहाणा निर्माता, दिग्दर्शक जेव्हा हीच कथा रंजक पद्धतीने मोठ्या पडद्यावर मांडतो, तेव्हा प्रचंड कुतूहलापोटी प्रेक्षक आपोआप थिएटरकडे वळू लागतो. 2022 मधला ‘कांतारा’ आणि नुकताच प्रदर्शित झालेला त्याचा प्रीक्वेल ‘कांतारा : चाप्टर 1’ या दोन्ही चित्रपटांबाबत हेच घडलंय. प्रादेशिक गोष्टच तुम्हाला जागतिक पातळीवर पोहोचवू शकते, हा फंडा अभिनेता, दिग्दर्शक ऋषभ शेट्टीला कळून चुकला आहे.

कोणत्याही प्रदेशातील स्थानिक संरक्षक देवतांची पूजा वैदिक काळापासून सुरू आहे की नाही हे सांगणं कठीण आहे. परंतु जेव्हा आपण या लोककथा आणि या कथांद्वारे त्या देवतांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्यांचं निसर्गाशी असलेलं नातं त्यांना वैदिक परंपरेच्या जवळ आणतं. मग ते देवता उत्तरेकडील गावांच्या सीमेवर स्थापित डीह बाबा असो, पिंपळ किंवा वटवृक्षावर राहणारे बरम बाबा (ब्रह्मराक्षस) असो, तलावांचे संरक्षक देवता बूडम बाबा असो किंवा अलिकडच्या ‘कांतारा’ चित्रपटात दाखवलेले गुलिगा आणि पंजुर्ली असोत. चित्रपटांमुळे हे लोककथांविषयी आणि स्थानिक देवदेवतांविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड कुतूहल निर्माण झालं आहे.

लोक देवतांची परंपरा आणि निसर्गपूजा

आपल्याला भरभरून काही देणाऱ्या, आपल्यापेक्षा असीम शक्तिशाली असलेल्या आणि क्षणार्धात सर्व विनाश करण्यास समर्थ असलेल्या निसर्गदेवताची पूजा मानव अनादी काळापासून करत आला आहे. ‘कांतारा’ या कन्नड चित्रपटाच्या यशामुळे स्थानिक संरक्षक देवतांची पूजा आणि स्थानिक भूत कोला उत्सव प्रकाशझोतात आला. हा चित्रपट जरी काल्पनिक कथेवर आधारित असला तरी दाखवलेले स्थानिक देवता आणि उत्सव वास्तविक परंपरेतून घेतलेले आहेत.

कुलदेवता किंवा कुलरक्षक म्हणजे काय?

दक्षिण कर्नाटकातील तुलूनाडू प्रदेश आणि केरळच्या काही भागात दैवांची पूजा केली जाते. हे दैव म्हणजेच स्थानिक लोकदेवता. त्यांची पूजा कदाचित वैदिक काळाच्या आधीपासून सुरू झाली असावी. याबाबत अद्याप निश्चित संशोधन समोर आलेलं नाही. हिंदू धर्मात देवतांना त्यांच्या आश्रयानुसार विभागलं जातं. कुलदेवता हे एका कुळाशी संबंधित असतात, तर ग्रामदेवता हे गावातील समुदायाशी संबंधित असतात. काही इष्टदेवता व्यक्तींद्वारे पूजनीय असतात. काही दैवांना क्षेत्रपाल किंवा विशिष्ट भूमीचे संरक्षक देवताही म्हटले जातात.

नृत्याशी संबंधित परंपरा, ज्यामध्ये दैव कलाकाराचं घेतात रुप

पारंपरिक पद्धतीत दैवांची पूजा मोकळ्या ठिकाणी केली जाते. ही दैव पूजा मुख्य प्रवाहातील हिंदू धर्मापेक्षा वेगळ्या लोक परंपरांशी संबंधित असते. तरी त्याला त्याचाच एक भाग मानलं जातं. तुलूनाडूमध्ये अशा लोकदेवतांची पूजा ‘भूत कोला’ किंवा ‘दैव कोला’ उत्सवादरम्यान केली जाते. यामध्ये एक नृत्य कलाकार देवतेच्या आत्म्याचं प्रतिनिधित्व करतो. या नृत्यादरम्यान देव त्याच्या शरीरात प्रवेश करतो, असं मानलं जातं.

काही लोकप्रिय दैवांमध्ये पंजुर्ली, पिलिपूटा, कलकुडा, कल्बुर्ती, पिलिचामुंडी, गुलिगा, कोटी चेन्नाया यांचा समावेश आहे. या दैवांची पूजा मोकळ्या जागेत झाडाखाली ठेवलेल्या दगडांच्या स्वरुपात केली जात होती. परंतु नंतरच्या काळात त्यांच्या पूजेसाठी मूर्ती वापरल्या जाऊ लागल्या.

पंजुर्ली आणि गुलिगाची कथा

‘कांतारा’ या चित्रपटाची कथा पंजुर्ली आणि गुलिगा या दोन देवतांच्या पूजेभोवती फिरते. पंजुर्ली दैवाची कथा दंतकथांमदून उलगडली आहे. या कथेत शिव आणि पार्वती यांना प्रिय असलेल्या जंगलात एक रानडुक्कर मरण पावल्याचं सांगितलं गेलं. हे मधुवन होतं, जे देवतांनी (शिव आणि पार्वती) त्यांच्या एकांतवासासाठी, ध्यानासाठी निवडलं होतं. कैलासशिवाय पृथ्वीवरील जंगलांमध्ये त्यांचं ध्यान केंद्र होतं. या कथेनुसार माता पार्वतीने या डुक्कराच्या पिल्लाला दत्तक घेतलं होतं. हे डुक्कर जसजसं मोठं होत गेलं, तसतसं ते विनाशकारी बनलं. त्यानंतर शंकराने त्याला वश करत लोकांचं आणि मधुवनाचं रक्षण करण्यासाठी नियुक्त केलं. या डुक्कराला पंजुर्ली म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

पाषाणातून गुलिगाचा जन्म

याच लोककथांनुसार गुलिगाचा जन्म शंकराने स्वत: पाण्यात टाकलेल्या दगडापासून झाला. गुलिगा भगवान विष्णूची सेवा करण्यासाठी आला आणि त्यांच्या आज्ञेनुसार तो निसर्गरक्षणाचा देवता बनला. पंजुर्ली आणि गुलिगा यांच्यात सुरुवातीला भांडण झाल्याचीही आख्यायिका आहे. परंतु देवीच्या हस्तक्षेपामुळे ते नंतर मित्र बनवले आणि एकमेकांचे संरक्षकही बनले. ही लोककथा शैव आणि वैष्णव यांच्यातील संघर्ष आणि नंतर त्यांच्यातील मैत्रीचं चित्रण करतं.

तुलूनाडूमधील भूत कोला उत्सव

तुलू कॅलेंडरनुसार डिसेंबर ते मे दरम्यान साजरा होणाऱ्या वार्षिक भूत कोला उत्सवात दैवाची पूजा केली जाते. या उत्सवादरम्यान एक कलाकार विशेष पोशाखात आणि मुखवट्यात दैवाचं प्रतिनिधित्व करतो आणि अत्यंत उत्साहाने नृत्य करतो. आत्म्याच्या रुपात तो कलाकार एक भविष्यवेत्ता, एक न्यायाधीश आणि गावप्रमुख बनवून सर्व वादांचं निराकरण करतो. या उत्सवात विविध जाती आणि समुदायातील स्थानिक लोक सहभागी होतात. ज्या ठिकाणाला देवतेचं निवासस्थान मानलं जातं, तिथल्या भूमीवर हा उत्सव पार पडतो. कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये सादर होणाऱ्या ‘यक्षगान’मध्ये थोडीफार भूत कोलाने प्रभावित नाट्य शैली पहायला मिळते.

एखाद्या व्यक्तीला दैवाने नियंत्रित करणं यासारख्या घटने केवळ दक्षिण भारतातच नाही तर संपूर्ण देशातील विविध भागात पहायला मिळतात. ग्रामदेवता, स्थानिक देवता आणि लोकदेवता यांनी ते ओळखले जातात. उत्तर भारतातील कोणत्याही गावात गेलात तर तुम्हाला गावाच्या वेशीवर डीह बाबाचं स्थान आणि मंदिर आवर्जून पहायला मिळतं. हे डीह बाबाच गावाचे रक्षक देवता मानले जातात.

त्याचप्रमाणे काहींच्या अंगात देव संचारल्याच्या घटना आजही पाहिल्या जातात. परंतु त्याकडे अनेकदा केवळ अंधश्रद्धा म्हणून पाहिलं जातं. उत्तराखंडमधील जागेश्वर धाम इथं जेव्हा जागर आयोजित केल जातो, तेव्हा ढाक वादकाच्या अंगात अनेकदा देव येतो. राजस्थानमधील करौली देवी मंदिरात अजूनही भगतांच्या वंशजांच्या अंगात देवी येते आणि त्या देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविक गर्दी करतात. बिहारच्या गोपालगंजमध्ये थावे देवीचं मंदिर आहे. या मंदिरामागील आख्यायिका आणि श्रद्धा अशी आहे की देवी स्थानिक भक्त रहसूच्या शरीरात प्रकट झाली आणि दर्शन दिलं. मंदिरात रहसू भक्ताच्या डोक्यातून हात बाहेर दाखवणाऱ्या देवीची प्रतिमा आहे. त्याचं दर्शन करण्यासाठी अनेक भाविक तिथे येतात आणि चैत्र नवरात्रीनिमित्त तिथे मोठी जत्रा भरते.

केवळ पौराणिक कथांमध्येच नाही तर भारतातील लोकपरंपरेत अशा दैवांची मोठी मान्यता आहे. त्यांच्याशी संबंधित प्रदेशात आणि समुदायात त्यांची पूजा करण्याची परंपरा अजूनही जिवंत आहे.