
Sunjay Kapur Property: अभिनेत्री करिश्मा कपूर घटस्फोटानंतर दोन मुलांचा सांभाळ एकटी करते. दिवंगत उद्योजक संजय कपूर याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर करिश्मा हिने ‘सिंगल मदर’ म्हणून दोन मुलांचा सांभाळ केला. तर संजय याने मात्र तिसरं लग्न केलं. दरम्यान, काही दिवसांपूर्वी संजय कपूर याचं निधन झालं. वडिलांच्या मृत्यूमुळे करिश्माची दोन्ही मुलं दुःखात होते. मात्र, आता त्यांनी संजय कपूर याची तिसरी पत्नी आणि सावत्र आई प्रिया कपूर हिच्यावर त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेत फेरफार केल्याचा आरोप करत दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे आणि मालमत्तेत त्यांचा वाटा मागितला आहे.
वडिलांच्या मृत्यूनंतर, कियान आणि समायरा यांनी त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेत वाटा मागितला आहे आणि त्यासाठी त्यांना न्यायालयाची मदत घ्यावी लागली आहे. संजय याची तिसरी पत्नी प्रिया कपूरने वडिलांच्या मृत्युपत्रात फसवणूक केली आहे आणि संपूर्ण मालमत्तेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप करिश्माच्या मुलांनी केला आहे.
समायरा आणि कियान यांनी आई करिश्मा कपूर हिच्यामार्फत दाखल केलेल्या खटल्यात असा दावा केला आहे की प्रियाने संजयचं बनावट मृत्युपत्र तयार केलं आहे. करिश्माच्या मुलांच्या म्हणण्यानुसार, मृत्युपत्र हे कायदेशीर आणि वैध दस्तऐवज नाही, तर ते बनावट मृत्युपत्र आहे. आम्हाला मृत्युपत्राची मूळ प्रतही दाखवण्यात आलेली नाही… असं देखील सांगण्यात येत आहे.
करिश्मा कपूर आणि प्रिया कपूर यांचा पूर्व पती संजय कपूर एक खूप श्रीमंत उद्योगपती होता. त्याने 30 हजार कोटी रुपयांचे साम्राज्य मागे सोडलं आहे. पण, आता करिश्माची मुलं आणि प्रिया कपूर यांच्यात त्याच्या प्रॉपर्टीवरून वाद सुरू आहे. कियान आणि समायरा यांचा आरोप आहे की, प्रिया त्यांना त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेतून बाहेर काढू इच्छित आहे.
संजयची बहीण मंधीरा कपूरनेही प्रियावर आरोप केला होता की जेव्हा कुटुंब कठीण काळातून जात होतं, तेव्हा प्रियाने तिच्या आईला बंद दाराच्या मागे कागदपत्रांवर सही करण्यास भाग पाडलं. असं दोन वेळा करण्यात आल्याचं देखील सांगितलं जात आहे.
मंधीरा म्हणाली, ‘माझ्या आईने मला सांगितलं मला माहिती नाही कोणत्या कागदपत्रांवर माझ्याकडूव सही करून घेतली आहे.’ याचं उत्तर अद्याप मंदीरा आणि तिच्या आईला देखील मिळालेलं नाही.