संजय कपूरच्या मृत्यपत्रात मोठ्या चुका; करिश्माच्या मुलांच्या कोर्टात दावा, स्वत:च्या मुलाचंच नाव..

अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि बिझनेसमन संजय कपूरच्या निधनानंतर त्याच्या संपत्तीवरून मोठा वाद सुरू आहे. करिश्माच्या मुलांनी मृत्यूपत्राबाबत कोर्टात धाव घेतली आहे. यावेळी त्यांनी मृत्यूपत्रातील काही चुकांचा दावा केला आहे.

संजय कपूरच्या मृत्यपत्रात मोठ्या चुका; करिश्माच्या मुलांच्या कोर्टात दावा, स्वत:च्या मुलाचंच नाव..
करिश्मा कपूर आणि तिची मुलं, संजय कपूर
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 14, 2025 | 9:16 AM

अभिनेत्री करिश्मा कपूरच्या मुलांनी वडील संजय कपूर यांचं मृत्यूपत्र बनावट असल्याचा आरोप करत दिल्ली उच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे. मृत्यूपत्रात मुलाचं नाव आणि मुलीचा पत्ता चुकीचा लिहिला असल्याचा त्यांचा आरोप आहे. यामुळे संशय निर्माण होत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी करिश्माच्या मुलांच्या वतीने न्यायालयात युक्तीवाद केला. इतक्या सुशिक्षित आणि बुद्धिमान व्यक्तीकडून अशा पद्धतीचा निष्काळजीपणा घडू शकत नाही, असं ते म्हणाले.

महेश जेठमलानी कोर्टात म्हणाले, “मृत्यूपत्र इतक्या निष्काळजीपणाने लिहिलं गेलंय की त्यामुळे संजय कपूरची प्रतिमा होते.” करिश्माची मुलगी समायरा कपूर आणि तिच्या भावाने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामध्ये असा आरोप करण्यात आला आहे की मृत्यूपत्र खरं नाही. त्यात त्यांच्या वडिलांची मालमत्ता, दागिने आणि डिजिटल मालमत्ता (क्रिप्टो) यांची अचूक माहिती देण्यात आलेली नाही. मृत्यूपत्राची अंमलबजावणी करणाऱ्या श्रद्धा सुरी मारवाह यांनाही कधी त्यांच्या जबाबदारीची माहिती देण्यात आली नाही.

“हे मृत्यपत्र 21 मार्च 2025 रोजीचं आहे. परंतु त्या तारखेपूर्वी आणि नंतर त्यात अनेक बदल करण्यात आले. चौकशीत असं दिसून आलं की मृत्यूपत्र हे नितीन शर्मा नावाच्या व्यक्तीच्या संगणकाचा वापर करून तयार करण्यात आली होती. तर संजय कपूर त्यावेळी त्यांच्या मुलासोबत सुट्टीवर होते. दुसऱ्याच्या संगणकाचा वापर करून कोणीतरी त्यांचं मृत्यूपत्र का तयार करेल”, असा प्रश्न महेश जेठमलानी यांनी कोर्टात उपस्थित केला. इतकंच नव्हे तर व्हॉट्स अॅप चॅट आणि कागदपत्रांमध्ये विरोधाभास असल्याचंही त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं.

दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करताना विचारलं की संजय कपूर यांनी यापूर्वी मृत्यूपत्र बनवलं होतं का? त्यावर मुलांच्या वकिलांनी माहित नसल्याचं उत्तर दिलं. या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे.

सोना कॉमस्टार या आघाडीच्या ऑटो पार्ट्स उत्पादक कंपनीचे अध्यक्ष संजय कपूरचं जूनमध्ये लंडनमध्ये पोलो खेळताना निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाल्याचं नंतर उघडकीस आलं. संजयने 2003 मध्ये करिश्मा कपूरशी लग्न केलं होतं. या दोघांना समायरा आणि कियान ही दोन मुलं आहेत. तर 2016 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला आणि त्याच्या एक वर्षानंतर 2017 मध्ये संजयने प्रिया सचदेवशी लग्न केलं.