तिनेच मोडला करिश्माचा संसार..; संजय कपूरच्या बहिणीचा धक्कादायक दावा
करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि बिझनेसमन संजय कपूरच्या प्रॉपर्टीवरून वाद सुरू असताना आता त्याच्या बहिणीने धक्कादायक दावा केला आहे. प्रिया सचदेवने करिश्माचा संसार मोडला, असा आरोप तिने केला आहे.

अभिनेत्री करिश्मा कपूरने 2003 मध्ये बिझनेसमन संजय कपूरशी लग्न केलं. या दोघांना समायरा आणि कियान ही दोन मुलं आहेत. परंतु 2016 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. 12 जून 2025 रोजी संजयचं लंडनमध्ये पोलो खेळताना निधन झालं. आता संजयची बहीण मंदिरा कपूर स्मिथने तिच्या भावाबद्दल धक्कादायक दावा केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने करिश्माचा संसार मोडल्याचा आरोप प्रिया सचदेववर केला आहे. प्रिया ही संजयची तिसरी पत्नी आहे. संजयच्या निधनानंतर त्याच्या संपत्तीचा वाद सध्या कोर्टात सुरू आहे. या वादादरम्यान मंदिराचा हा दावा चर्चेत आला आहे.
विक्की लालवानीला दिलेल्या मुलाखतीत मंदिराने सांगितलं, “मला त्या विमानातील भेटीनंतरच संजय आणि प्रियाच्या नात्याबद्दल समजलं होतं. मी त्या दोघांसाठी अजिबात खुश नव्हते. कारण लोलो (करिश्मा) आणि माझ्या भावाचं नातं त्यावेळी चांगल्या स्थितीत होतं. कियानचा तेव्हा नुकताच जन्म झाला होता. माझ्या भावाचं त्याच्या मुलांवर खूप प्रेम होतं. एखाद्या दुसऱ्या महिलेसाठी अशा महिलेची उपेक्षा करणं, जिने नुकताच बाळाला जन्म, हे मला अत्यंत चुकीचं वाटतं. कोणत्याही कुटुंबात येऊन त्यात फूट पाडणं योग्य नाही. तुम्ही एका चांगल्या संसाराला किंवा जे आपलं नातं टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना अशाप्रकारे तोडू शकत नाही. तिने एक पाऊल मागे जायला हवं होतं. तुम्ही एखाद्याचा संसार मोडू शकत नाही. लोलोवर तशी वेळ यायला पाहिजे नव्हती.”
याविषयी ती पुढे म्हणाली, “माझे वडील त्या नात्याच्या स्पष्ट विरोधात होते. त्यांनी म्हटलं होतं की, संजयने तिच्याशी लग्न करू नये. असं केलं तर मी त्याला कधीच पाहू इच्छित नाही आणि त्यांची मुलं होऊ शकत नाहीत. आमच्या कुटुंबातील कोणीच त्यांची साथ दिली नव्हती. त्याच्याकडे सर्वकाही होतं. त्यांनी हे प्रकरण सोडवलं पाहिजे होतं. मी आणि माझी बहीण त्या लग्नात सहभागी झाले नव्हते. आम्ही याबाबत खूप स्पष्ट होतो की या लग्नाला आमचा कधीच पाठिंबा नसेल. त्यावेळी आम्ही एकमेकांशी बोलत नव्हतो. त्या कठीण काळात मी करिश्मासोबत राहू शकले नाही, याचा मला पश्चात्ताप होतो. त्यावेळी मी तिच्याशीही बोलत नव्हते. मला असं वाटतं की ती माझ्यावर नाराज होती आणि यासाठी मी तिला अजिबात दोष देत नाही. मला वाईट यासाठी वाटत होतं, कारण ती माझी सर्वांत चांगली मैत्रीण होती. मला तिच्यासाठी तिथे उभं राहणं गरजेचं होतं.” करिश्माला घटस्फोट दिल्यानंतर 2017 मध्ये संजय कपूरने मॉडेल प्रिया सचदेवशी लग्न केलं. या दोघांना एक मुलगा आहे.
