कतरिना कैफ खरंच प्रेग्नंट; भारतात नव्हे तर ‘या’ देशात देणार बाळाला जन्म?

अभिनेत्री कतरिना कैफ गरोदर असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. अशातच पती विकी कौशलसोबत तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. कतरिना खरंच प्रेग्नंट असून ती परदेशात बाळाला जन्म देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.

कतरिना कैफ खरंच प्रेग्नंट; भारतात नव्हे तर या देशात देणार बाळाला जन्म?
विकी कौशल, कतरिना कैफ
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 02, 2025 | 3:05 PM

अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा लंडनमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून एकच चर्चा आहे, ती म्हणजे कतरिनाच्या गरोदरपणाची. लंडनच्या रस्त्यावर कतरिना आणि विकी एकमेकांच्या हातात हात घालून निवांत फिरताना दिसले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. या व्हिडीओमध्ये कतरिनाने जाडसर जॅकेट घातला होता, त्यामुळे तिचं पोट स्पष्ट दिसत नव्हतं. पण तिच्या चालण्यावरून नेटकऱ्यांनी अंदाज लावला की ती प्रेग्नंट असू शकते. या चर्चांनंतर आता कतरिनाच्या गरोदरपणाविषयी महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. ‘झूम’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, कतरिना खरंच प्रेग्नंट असून ती लंडनमध्ये पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.

“जर सर्वकाही व्यवस्थित घडलं तर कतरिना आणि विकी हे त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत युकेमध्येच करू शकतात”, अशी माहिती सूत्रांनी ‘झूम’ या वेबसाइटला दिली. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या दुसऱ्या बाळाला लंडनमध्येच जन्म दिला होता. कतरिना ही युकेमध्येच लहानाची मोठी झाली आणि लंडनमधील हँपस्टीड याठिकाणी तिचं स्वत:चं घरसुद्धा आहे. त्यामुळे लंडनमध्ये कतरिना तिच्या बाळाला जन्म देऊ शकते. विकीसुद्धा कतरिनासोबत सध्या लंडनमध्येच आहे.

लंडनमधील रस्त्यावर हातात हात घालून फिरतानाचा कतरिना-विकीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण आलं. भारतातील पापाराझींपासून दूर राहण्यासाठी आणि आपलं खासगीपण जपण्यासाठी कतरिना-विकीने लंडनमध्ये बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला असावा, असाही अंदाज व्यक्त केला जातोय. कतरिना आणि विकीने 9 डिसेंबर 2021 रोजी राजस्थानमध्ये लग्न केलं. या लग्नाला बॉलिवूड इंडस्ट्रीतील मोजके पाहुणे उपस्थित होते.

दुसरीकडे अभिनेत्री दीपिका पादुकोणसुद्धा गरोदर आहे. फेब्रुवारी महिन्यात तिने प्रेग्नंसीची घोषणा केली होती. सप्टेंबरमध्ये बाळाचा जन्म होणार असल्याचंही तिने सांगितलं होतं. नुकतंच मतदानाच्या दिवशी दीपिका आणि रणवीरचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये पहिल्यांदाच दीपिकाचा बेबी बंप पहायला मिळाला. त्यावरून नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला होता.