तुम्हाला हिंदूपण तुमच्या बाजूने नकोत का? केतकी चितळेची महायुती सरकारवर आगपाखड

राज्यातील वक्फ मंडळाचं बळकटीकरण करण्यासाठी सरकारने 10 कोटींच्या निधीची तरतूद केली. याविरोधात अभिनेत्री केतकी चितळेनं तीव्र संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत तिने राज्य सरकारवर टीका केली आहे.

तुम्हाला हिंदूपण तुमच्या बाजूने नकोत का? केतकी चितळेची महायुती सरकारवर आगपाखड
केतकी चितळे
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 14, 2024 | 5:24 PM

अभिनेत्री केतकी चितळे नेहमीच तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी आणि भूमिकांसाठी चर्चेत असते. नुकताच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने वक्फ बोर्डाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर सडकून टीका केली आहे. तुम्हाला आता हिंदूंचीही मतं नकोत का, असा थेट सवाल तिने सरकारला केला आहे. राज्यातील वक्फ मंडळाचं बळकटीकरण करण्यासाठी सरकारने 10 कोटींच्या निधीची तरतूद केली. त्यापैकी दोन कोटी रुपये 10 जूनला वितरित केल्याचा शासन आदेश अल्पसंख्याक विकास विभागाने काढला. यावरूनच केतकीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘तीन चाकी सायकलने बहुतेक प्रचंड मनावर घेतलं आहे की आपण कसं पडून दाखवायचं ते,’ असं कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

काय म्हणाली केतकी?

“एक धक्कादायक बातमी वाचून मी उठले. त्यामुळे काय बोलावं तेच कळत नाहीये. ज्या लोकांनी तुम्हाला मतंही दिली नाहीत, त्यांच्या बळकटीकरणासाठी तुम्ही दहा कोटी रुपये दिले. तुम्ही बधीर झालाय की आम्हाला बधीर करून सोडणार आहात? मी नेहमी म्हणत होते की, लोकसभेत कोणाला मत द्यायचंय ते ठरलेलं आहे. मला पंतप्रधान कोण हवा आहे, हे बघूनच मत दिलं होतं. पण विधानसभेत कोणता झेंडा हाती घेऊ असा प्रश्न पडलाय. देशात सर्वत्र मोर्चे काढले जात आहेत. वक्फ बोर्डाला रद्द करण्याची मागणी होत आहे आणि तुम्ही त्यांनाच दहा कोटी रुपये दिले. आधीच तीन तिघाडी सरकार आहे तुमचं. तुम्ही ठरवलंय का, की हिंदू तुमच्या बाजूला नकोत, नेमकं म्हणणं काय आहे तुमचं,” असा सवाल केतकीने केला आहे.

“तिघांच्या सरकारमधील एकजण परत काकांकडे जाणार आणि हातापाया पडून मला परत घ्या, असं बोलणार. एक जण परत सरकार चालवायला येत नाही म्हणून तीन चाकांची रिक्षा चालवायला जाणार आणि एकजण राजीनामा देतोय पण तो राजीनामा घेतला जात नाहीये,” असं म्हणत केतकीने अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

या व्हिडीओत केतकीचा संताप स्पष्ट पहायला मिळतोय. “वक्फ बोर्डाचं बळकटीकरण कशाला करताय? उद्या वक्फ बोर्डवाले तुमच्या घरी येतील आणि तुमच्या जमिनीवर दावा करतील, जमीन हडप करतील, त्याविरोधात तुम्ही काहीच करू शकणार नाही. वक्फ बोर्डाने घेतलेला निर्णय हायकोर्ट, सुप्रीम कोर्टातही बदलता येत नाही. तुम्ही संघाला तोडलंत, आता सनातनी लोकांना तोडताय. निवडणुकीत आपण नोटा या पर्यायाच्या विरोधात होतो. आता तिघाडी सरकारमुळे नोटाला मतदान करावं लागणार आहे. बंगालमध्ये ममता दीदी बांग्लादेशींना बोलावत आहेत. आता तुम्ही रोहिंग्यांना मुंबईत वसवा, तुम्ही मुस्लीम राष्ट्र घोषित करा ना.. कोणाची वाट बघताय, महाराष्ट्राचं नामांतर करा,” अशा शब्दांत तिने संताप व्यक्त केला आहे.