बिग बॉस हिंदीत माझी वाइल्ड कार्ड एण्ट्री..; कोकण हार्टेड गर्लचं मोठं सरप्राइज

'बिग बॉस 19' सध्या चांगलाच गाजतोय. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर 'कोकण हार्टेड गर्ल' म्हणजेच अंकिता वालावलकरने यासंदर्भात एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. बिग बॉस हिंदीमध्ये मी वाईल्ड कार्ड एण्ट्री करणार, असं ती यात सांगताना दिसतेय.

बिग बॉस हिंदीत माझी वाइल्ड कार्ड एण्ट्री..; कोकण हार्टेड गर्लचं मोठं सरप्राइज
Salman Khan and Ankita Walawalkar
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 08, 2025 | 8:29 AM

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ‘कोकण हार्टेड गर्ल’ अर्थात अंकिता वालावलकरने ‘बिग बॉस मराठी’मधून प्रेक्षकांची मनं जिंकली. या सिझनच्या ग्रँड फिनालेपर्यंत ती पोहोचली होती. परंतु सूरज चव्हाणने विजेतेपदाची ट्रॉफी आपल्या नावे केली होती. त्यानंतर आता ‘बिग बॉस 19’ सुरू असताना अंकिताने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती हिंदी बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एण्ट्री करण्याबाबत बोलताना दिसतेय. या प्रवासासाठी मी खूप उत्सुक आहे, असंही ती म्हणतेय. परंतु या व्हिडीओच्या अखेरीस मोठा ट्विस्ट आहे. हा ट्विस्ट पाहून नेटकरी त्यावर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

काय म्हणाली अंकिता?

“बिग बॉस हिंदीच्या घरात आज माझी वाईल्ड कार्ड एण्ट्री होतेय. या प्रवासासाठी मी खूप उत्सुक आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या वेळी मी ‘बिग बॉस’ पाहिलंसुद्धा नव्हतं. पण आता माझ्या गाठीशी अनुभवसुद्धा आहे. त्यामुळेच या प्रवासासाठी मी खूप उत्सुक आहे. बिग बॉस मराठीच्या घरात असताना तुम्ही मला खूप प्रेम आणि आशीर्वाद दिले. असंच प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत राहू द्या. तुमचं हेच प्रेम आणि आशीर्वाद मला ट्रॉफी..” असं अंकिता म्हणते आणि तितक्यात अंकिताचा नवरा कुणाल तिला झोपेतून उठवतो. तेव्हा हे सर्व स्वप्न होतं, याची जाणीव तिला होते. अंकिताच्या या मजेशीर व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘अरे आम्हीसुद्धा खूप उत्सुक होतो, पण हे काय झालं’, असं एकाने लिहिलं. तर ‘तू गेलीस तरी उत्तम खेळशील यात काही शंका नाही’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘मी अर्धा व्हिडीओ पाहून हॉटस्टार डाऊनलोड केला, नंतर पूर्ण व्हिडीओ बघितला’, असंही एका युजरने लिहिलं. ‘अरे आमचं स्वप्न मोडलंस’, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. यावरून अंकिताला हिंदी बिग बॉसमध्ये पहायची अनेकांची इच्छा असल्याचं स्पष्ट जाणवतंय.

‘बिग बॉस मराठी 5’मध्ये अंकिता खूप चांगली खेळताना दिसली. सोशल मीडियावर आधीपासूनच लोकप्रिय असलेल्या अंकिताला बिग बॉसमुळे आणखी प्रसिद्धी मिळाली. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर तिने संगीत दिग्दर्शक कुणाल भगतशी लग्न केलं.