4 आठवड्यांत मराठी चित्रपटाची बजेटच्या चौपट कमाई; आता सवलतीच्या तिकिटांसाठी पुढाकार
चार आठवड्यांत या चित्रपटाने बजेटच्या चौपट कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर अगदी पहिल्या दिवसापासून या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. आता या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी सवलतीच्या तिकिटांसाठी पुढाकार घेतला आहे.

मराठी शाळांचं महत्त्व अधोरेखित करणारा आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळवत अवघ्या चार आठवड्यांत या चित्रपटाने 24.03 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सर्व वयोगटांतील प्रेक्षकांनी या चित्रपटावर प्रेमाचा वर्षाव केला असून, अनेक ठिकाणी हाऊसफुल्ल शोजसह सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. या यशानंतर आता चलचित्र मंडळीने मराठी शाळांना समर्पित ‘मराठी शाळा योजना’ हा खास उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत मराठी शाळा, विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी सवलतीच्या दरात विशेष शो आयोजित करण्यात येत आहेत.
शाळांमधील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मराठी माध्यमाची ओळख-संस्कृती आणि शाळेसोबत असलेलं भावनिक नातं अधिक घट्ट करण्याच्या उद्देशाने हे शो आयोजित केले जात आहेत. मराठी शाळांसाठी हा चित्रपट एक भावनिक आणि सामाजिक अनुभव ठरत आहे. ‘मराठी शाळा योजना’ ही योजना आपल्या शाळांसाठी आयोजित करण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था आणि माजी विद्यार्थी पुढाकार घेत आहेत. सवलतीच्या तिकिटांमुळे अधिकाधिक मराठी शाळांना हा चित्रपट पाहाण्याची संधी मिळत आहे.
याबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला, “प्रेक्षकांकडून मिळत असलेलं प्रेम आमच्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. मात्र, त्याहूनही मोठं समाधान म्हणजे मराठी शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षक स्वतःला या चित्रपटात पाहात आहेत. त्यांना हा चित्रपट आपलासा वाटत आहे. ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ चित्रपट मराठी शाळा, मराठी भाषेचं महत्त्व सांगतो. तो जास्तीत जास्त मराठी शाळांपर्यंत पोहोचावा, विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी तो अनुभवावा, यासाठीच चलचित्र मंडळीच्या वतीने ‘मराठी शाळा योजना’ ही सवलतदर देणारी सुरू करण्यात आली आहे.”
‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटात दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर मुख्याध्यापकाच्या भूमिकेत असून, त्यांच्यासोबत अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर, निर्मिती सावंत आणि मराठी चित्रपटात पहिल्यांदाच पदार्पण करणारी प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट आहे. चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन हेमंत ढोमे याचं असून, क्षिती जोग निर्माती आहे. तर सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ आहेत.