कोविडनंतर सर्वाधिक कमाई करणारा 5 वा मराठी चित्रपट; विक्रमापासून फक्त 61 लाख दूर
2026 या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला हा मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करतोय. बॉलिवूड चित्रपटांशी टक्कर होऊनही थिएटरमध्ये हा चित्रपट टिकून आहे. फक्त 6 कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनला आहे.

सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, प्राजक्ता कोळी, क्षिती जोग, कादंबरी कदम आणि हरिश दुधाडे यांच्या भूमिका असलेला ‘क्रांतिज्योती विद्यालय’ हा मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठा विक्रम रचण्यापासून अवघे काही पावलं दूर आहे. प्रदर्शनाच्या चौथ्या आठवड्यात असूनही प्रजासत्ताक दिनी या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. ‘बॉर्डर 2’सारखा मोठा चित्रपट बॉक्स ऑफिसवर असतानाही ‘क्रांतिज्योती विद्यालय’ने 35 लाख रुपये कमावले होते. मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, त्या वाढल्या पहिजेत आणि मातृभाषेतून दर्जेदार शिक्षण देणारी व्यवस्था उभी राहायला हवी, विशेष म्हणजे या सर्व गोष्टींसाठी स्वत:ला मराठी म्हणवणाऱ्या प्रत्येकाकडून प्रयत्न व्हायला हवेत, हे सांगणारा ‘क्रांतीज्योती विद्यालय: मराठी माध्यम’ हा चित्रपट आहे.
‘क्रांतिज्योती विद्यालय’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन
पहिला आठवडा- 6.14 कोटी रुपये दुसरा आठवडा- 8.76 कोटी रुपये तिसरा आठवडा- 5.59 कोटी रुपये 23 वा दिवस- 26 लाख रुपये 24 वा दिवस- 65 लाख रुपये 25 वा दिवस- 88 लाख रुपये 26 वा दिवस- 98 लाख रुपये 27 वा दिवस- 35 लाख रुपये एकूण कमाई- 23.61 कोटी रुपये
दिलीप प्रभावळकर यांच्या ‘दशावतार’ या चित्रपटाला मागे टाकण्यासाठी ‘क्रांतिज्योती विद्यालय’ला फक्त 61 लाखांची गरज आहे. हा आकडा पार केल्यास हेमंत ढोमेचा हा चित्रपट कोविडनंतरचा सर्वाधिक कमाई करणारा पाचवा मराठी चित्रपट ठरेल. ‘क्रांतिज्योती विद्यालय’ या चित्रपटा लेखन आणि दिग्दर्शन हेमंत ढोमेनं केलं असून या चित्रपटाचा बजेट जवळपास साडेसहा कोटी रुपये आहे.
कोविडनंतर सर्वाधिक कमाई करणारे 5 मराठी चित्रपट
बाईपण भारी देवा- 76.28 कोटी रुपये वेड- 61.2 कोटी रुपये पावनखिंड- 37.72 कोटी रुपये धर्मवीर- 24.67 कोटी रुपये दशावतार- 24.21 कोटी रुपये
सचिन खेडेकर, अमेय वाघ, क्षिती जोग, कादंबरी कदम, पुष्कराज चिरपुटकर, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, चिन्मयी सुमित, प्राजक्ता कोळी, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर यांनी त्यांच्या व्यक्तिरेखा सहजतेने साकारल्या आहेत. चित्रपटाचा मूळ विषय अत्यंत चोख मांडण्यात आला आहे. हेमंत ढोमेनं रंजक पद्धतीने विषयाचं गांभीर्य जाणवून दिलं आहे.
