खाता खाता शेंगदाणा नाकात अडकला, लेकासाठी आई-वडिलांची धावाधाव; डॉक्टरांनी अखेरच्या क्षणी…
मुंबईत 2 वर्षांच्या बाळाच्या श्वसननलिकेत शेंगदाणा अडकला होता. मुंबईतील खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी या बाळाला जीवनदान दिले. डॉक्टरांनी बाळाचा जीव वाचवल्याने कुटुंबांतील सदस्यांचे आभार मानताना डोळ्यातून पाणी आले.

मुंबईतील एका खासगी रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमनं अत्यंत नाजूक वैद्यकीय प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. या हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या पथकाने २३ महिन्यांच्या बाळाच्या डाव्या मुख्य श्वसननलिकेत अडकलेला शेंगदाणा सुरक्षितपणे बाहेर काढलाय. त्यांनी प्रगत फ्लेक्सिबल ब्रॉन्कोस्कोपी आणि क्रायो-तंत्रज्ञानाचा वापर केला. कोणतीही मोठी शस्त्रक्रिया न करता या चिमुकल्याचे प्राण वाचवण्यात आले. पृथ्वीक असे बाळाचे नाव आहे.
पृथ्वीकला दोन दिवसांपासून तीव्र खोकला, श्वास घेण्यास त्रास, ताप आणि उलट्या या लक्षणांमुळे मुंबईतील जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल केले होते. त्याला शेंगदाणे खाताना ठसका लागला होता. प्रथमोपचारांमुळे अर्धा शेंगदाणा बाहेर पडला. परंतु उरलेला तुकडा श्वसननलिकेत खोलवर जाऊन अडकला होता. त्यामुळे त्याच्या छातीच्या एचआरसीटी तपासणीत डाव्या मुख्य श्वसननलिकेचा मार्ग जवळपास पूर्णपणे बंद झाल्याचे आढळले. त्याचबरोबर पृथ्वीकच्या डावे फुफ्फुस हवा भरून फुगल्याचे व सूज आल्याचे स्पष्ट झाले.
पृथ्वीकच्या अतिशय लहान वय असल्याने रक्तस्रावाचा धोका होता. त्याचबरोबर मऊ झालेला शेंगदाणा तुटून फुफ्फुसात अधिक खोलवर जाण्याची भीती होती. त्यामुळे डॉक्टरांनी प्रथम व्हर्च्युअल ब्रॉन्कोस्कोपीद्वारे शेंगदाण्याचे स्थान निश्चित केले. त्यानंतर 4 मिमी फ्लेक्सिबल ब्रॉन्कोस्कोप आणि 1.1 मिमी क्रायोप्रोबच्या साहाय्याने 0.4 x 0.7 सेंमी आकाराचा शेंगदाणा गोठवून घट्ट पकडला. त्यानंतर अलगद बाहेर काढलाय. श्वसननलिकेतील सूज कमी करण्यासाठी ‘क्रायो-डीबल्किंग’ प्रक्रिया करण्यात आलीये. या प्रक्रियेनंतर पृथ्वीकची प्रकृती स्थिर आहे. त्याच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहे. या वैद्यकीय टीममध्ये कन्सल्टंट इंटरव्हेंशनल पल्मोनोलॉजिस्ट डॉ. कुशल चिडगुपकर, बालरोग विभागाचे संचालक डॉ. फजल नबी, आणि अॅनेस्थेसिओलॉजिस्ट डॉ. चित्रा व डॉ. मोहित यांनी महत्वाची कामगिरी बजावली.
डॉ. कुशल चिडगुपकर म्हणाले, लहान मुलांच्या श्वसननलिकेत अन्नकण अडकणे ही बाब अत्यंत धोकादायक आहे. ज्यामुळे गंभीर संसर्ग होऊ शकतो. क्रायोप्रोबसह फ्लेक्सिबल ब्रॉन्कोस्कोपचा वापर केल्याने शेंगदाणा गोठवून बाहेर काढता आला. तसेच श्वसननलिकेतील सूजही कमी करता आली. मिनिमली इन्व्हेसिव्ह पद्धत लहान मुलांसाठी अत्यंत सुरक्षित मानली जाते.
