
प्रसिद्ध गायक कुमार सानू यांनी 1986 मध्ये रीटा भट्टाचार्य यांच्याशी लग्न केलं होतं. या दोघांना तीन मुलं असून 1994 मध्ये ते विभक्त झाले. घटस्फोटाच्या जवळपास तीस वर्षांनंतर आता रीटा यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पूर्व पतीबद्दल बरेच गौप्यस्फोट केले आहेत. तिसऱ्या प्रेग्नंसीदरम्यान कुमार सानू यांनी बराच छळ केल्याचा आरोप रीटा यांनी केला. इतकंच नव्हे तर घरातून सर्व सामान घेऊन ते गर्लफ्रेंडसोबत राहू लागले होते, असाही खुलासा त्यांनी केला. या मुलाखतीत रीटा यांनी बाळासाहेब ठाकरेंशी संबंधित एक किस्सासुद्धा सांगितला. बाळासाहेब ठाकरेंमुळेच ‘आशिकी’ बंगला मिळाल्याचं त्यांनी म्हटलंय.
‘फिल्मी विंडो’ला दिलेल्या मुलाखतीत रीटा म्हणाल्या, “मी माझे दागिने विकून मुलांचं संगोपन केलं. लहान लेकरांना घरात सोडून मी कोर्टात जायचे आणि तिथे गेल्यावर मला कळायचं की कुमार सानू यांनी पुढली तारीख घेतली आहे. त्यांनी मला खूप त्रास दिला. बाळासाहेब ठाकरेंनी माझी एक मुलाखत पाहिली होती. तेव्हा त्यांनी राज ठाकरेंना मला फोन करायला सांगितलं होतं. मी त्यांच्याकडे न्यायाची मागणी केली होती. बाळासाहेबांनी मला ‘आशिकी’ बंगला मिळवून दिला होता. कुमार सानू यांनी तो मला दिला नव्हता. त्यातील 50 टक्के माझ्या नावावर होतं आणि उर्वरित 50 टक्के इतर पाच लोकांच्या नावावर होतं.”
“कुमार सानू अत्यंत धूर्त आहे. घटस्फोटाच्या सुनावणीदरम्यान मुंबई कोर्टाने जेव्हा त्यांना सांगितलं की माझा आयटी रिटर्न भरला पाहिजे, माझा दर्जा राखला पाहिजे, तेव्हा त्यांनी कोलकाता न्यायालयात धाव घेतली. मला पत्नी आणि मुलांसोबत राहायचं आहे, अशी याचिका तिथे दाखल केली. तिथल्या सर्व पोलीस आणि मंत्र्यांशी संगनमत केलं. सुनावणीदरम्यान मी कोर्टात गेले तेव्हा माझी चेष्टा केली. माझा तमाशा केला. जेव्हा माझा घटस्फोटाचा खटला मागे घेण्यात आला, तेव्हा ते आणि त्यांची मोठी बहीण गीतोश्री मुंबईला गेले. घरातील सर्व सामान घेईन ते त्यांच्या गर्लफ्रेंडच्या घरी राहायला गेले. त्यांनी माझ्या घरातील मायक्रोवेव्ह ओव्हनसुद्धा नेला होता. 12 ते 14 सुटकेस भरून सामान त्यांनी नेलं होतं”, असा आरोप रीटा यांनी केला.