
कॉमेडियन कुणाल कामराने त्याच्याविरोधातील हक्कभंगाच्या नोटिशीला उत्तर दिलं आहे. ‘माझ्या वक्तव्यामुळे महाराष्ट्र विधिमंडळाच्या कामकाजामध्ये कोणताही व्यत्यय आला नाही. त्यामुळे मला विशेष हक्कभंगाची नोटीस पाठवणं हे चुकीचं आहे,’ असं त्याने उत्तरात नमूद केलं आहे. कुणाल कामराविरोधात भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक टीका म्हणजे विधानमंडळाच्या कामकाजात अडथळा ठरत नाही, असं त्याने स्पष्ट केलंय.
“व्यक्ती कोणतीही असो, मग ती सरकारमधली असो किंवा नसो.. तिच्यावर अशी व्यंगात्मक वैयक्तिक टीका केली म्हणजे कामकाजात अडथळा ठरत नाही. माझ्या गाण्यामुळे मी कुठल्याही प्रकारे विधिमंडळाच्या कामात हस्तक्षेप केला नाही. यामध्ये फक्त टीका, व्यंग आणि कला वापरून मत मांडलं गेलं आहे. या गाण्याने जर मी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांचा अवमान केला असेन, तर माझा हेतू सभागृहाचा अवमान किंवा तिथल्या सदस्यांना चिथावणी देण्याचा नव्हता,” असं त्याने म्हटलंय.
कुणाल कामराने हेही म्हटलंय की, त्याच्याविरोधात होत असलेली कारवाई ही जाणूनबुजून आणि राजकीय दृष्टीने सुरू असून त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम केलं जातंय. “इतर नेत्यांनी जे शब्द स्वतःच्या भाषणात वापरले त्यांचाच वापर करून मी गाण गायलं, तर मी गायलेलं गाणं आक्षेपार्ह समजून माझ्यावरच कारवाई का,” असा सवाल त्याने केला.
23 मार्च 2025 रोजी कुणालने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरील एक विडंबनात्मक गीताचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या गीतेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान झाल्याचा दावा करत शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खार इथल्या हॅबिटॅट स्टुडिओची नासधूस केली होती. मात्र त्याबद्दल माफी मागणार नसल्याचं कुणालने स्पष्ट केलं होतं. इतकंच नव्हे तर त्यानंतरही त्याने काही व्यंगात्मक गाण्यांचे व्हिडीओ पोस्ट केले होते. काही दिवसांपूर्वी विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. त्यावरही कुणालने उपरोधिक गाणं सादर करत सरकारला डिवचलं होतं.