‘धुरंधर 2’बाबत इंडस्ट्रीचं सत्य उघड; दिग्दर्शकानेच केली पोलखोल; म्हणाला “इथे पाठीत खंजीर..”

बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाने 'धुरंधर 2'बाबत इंडस्ट्रीतल्या लोकांमध्ये काय भावना होती, याचा खुलासा केला आहे. हा चित्रपट पहिल्या सोमवारीच फ्लॉप होईल, असा अनेकांचा अंदाज असल्याचं त्याने म्हटलंय. हा दिग्दर्शक नेमकं काय म्हणाला, ते जाणून घ्या..

धुरंधर 2बाबत इंडस्ट्रीचं सत्य उघड; दिग्दर्शकानेच केली पोलखोल; म्हणाला इथे पाठीत खंजीर..
रणवीर सिंह
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 15, 2026 | 7:23 PM

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि बॉलिवूडपासून साऊथ फिल्म इंडस्ट्रीपर्यंत अनेकजण त्याचं तोंडभरून कौतुक करू लागले. परंतु या चित्रपटाच्या यशाबाबत काही लोकांमध्ये संभ्रम होता. इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या चित्रपट निर्मात्यांना वाटत होतं की, पहिल्या वीकेंडनंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकणार नाही, असा खुलासा एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने केला आहे. परंतु रणवीर सिंहच्या ‘धुरंधर 2’ने त्या सर्वांना चुकीचं ठरवलं. पहिल्या सोमवारपासून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार गती पकडली आणि जगभरात त्याने कमाईचे अनेक विक्रम रचले.

‘धुरंधर 2’ला नव्हता इंडस्ट्रीचा पाठिंबा

‘स्क्रीन’ला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक कुणाल कोहलीने खुलासा केला की, सुरुवातीला बॉलिवूड इंडस्ट्रीने या चित्रपटाला पाठिंबा दिला नव्हता. “इंडस्ट्रीने एखाद्या चित्रपटाला पाठिंबा दिला नाही तरीही तो हिट होऊ शकतो. धुरंधरला अजिबात पाठिंबा मिळाला नव्हता. मी ज्या ज्या मोठ्या दिग्दर्शकांशी बोललो, त्या सर्वांनी सांगितलं होतं की हा चित्रपट सोमवारीच थांबेल. पण त्याउलट सोमावरी चित्रपटाने आणखी वेग धरला होता”, असं कुणाल म्हणाला. ‘धुरंधर 2’ने पहिल्याच दिवशी तब्बल 102.55 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यानंतर पहिल्या सोमवारी 65 कोटी रुपये कमावले होते.

‘बॉर्डर 2’च्या यशाबद्दली होता संभ्रम

यावेळी कुणालने सनी देओलच्या ‘बॉर्डर 2’ या चित्रपटाचाही उल्लेख केला. “बॉर्डर 2 या चित्रपटालाही सुरुवातीला कोणी पाठिंबा दिला नव्हता. लोक म्हणत होते की हा चित्रपट दुसऱ्या आठवड्यातच थांबेल. पण त्या चित्रपटाने 300 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. तुम्ही काय म्हणताय? तो ब्लॉकबस्टर ठरला. चर्चा आता संपली आहे. त्यामुळे इंडस्ट्री तुम्हाला पाठिंबा देते की नाही, याने काहीच फरक पडत नाही”, असं मत कुणालने मांडलं.

कुणाल कोहलीने या मुलाखतीत त्याच्या स्वत:च्या ‘हम तुम’ या चित्रपटाशी संबंधित किस्साही सांगितला. 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात राणी मुखर्जी, सैफ अली खान आणि अभिषेक बच्चन यांनी भूमिका साकारल्या होत्या. कुणाल कोहलीने स्पष्ट केलं की, निर्माता आदित्य चोप्राने चित्रपटाच्या प्रीव्ह्यू शोला उपस्थित न राहण्याचा सल्ला दिला होता. कारण इंडस्ट्रीतील लोक सकारात्मक प्रतिसाद देणार नाही, अशी शक्यता होती. तो पुढे म्हणाला, “ते यशजी, आदित्य किंवा सैफला कॉल करू शकत होते, परंतु त्यांनी मला कॉल केला. शंभरपैकी असे एक-दोन लोकच असतात, परंतु सुदैवाने किमान ते एक-दोन लोक तरी आहेत.”

चित्रपटसृष्टीतील पाठिंबा खरा असतो का, असा प्रश्न विचारल्यावर कुणालने स्पष्टपणे उत्तर दिलं, “इथे ‘स्क्रॅच माय बॅक’ (उपकारांची देवाणघेणार) खूप दुर्मिळ असतं, कारण जर तुम्ही कोणाला तुमची पाठ खाजवू दिली (उपकार करू दिलं), तर ते तुमच्या पाठीत खंजीर खुपसू शकतात”, असं म्हणत कुणाल हसला.

Follow Us