लग्नाबद्दल ललित प्रभाकरने दिलं स्पष्ट अन् प्रामाणिक उत्तर; असंख्य तरुणींचा होईल हिरमोड

मराठी इंडस्ट्रीतला चॉकलेट बॉय ललित प्रभाकरने लग्न करण्याच्या निर्णयाबद्दल स्पष्ट आणि तितकंच प्रामाणिक उत्तर दिलं आहे. ललितचं हे उत्तर ऐकून कदाचित असंख्य तरुणींचा हिरमोड होईल.

लग्नाबद्दल ललित प्रभाकरने दिलं स्पष्ट अन् प्रामाणिक उत्तर; असंख्य तरुणींचा होईल हिरमोड
Lalit Prabhakar
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 11, 2026 | 9:00 AM

अभिनेता ललित प्रभाकर हा मराठी इंडस्ट्रीतला ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळखला जातो. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून तो घराघरात पोहोचला आणि आजही तो असंख्य तरुणींचा क्रश आहे. तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेला ललित आता 38 वर्षांचा असून त्याने अद्याप लग्न केलं नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ललित त्याच्या खासगी आयुष्यावर आणि लग्न करण्याच्या निर्णयावर मोकळेपणे व्यक्त झाला आहे. ललितला अनेकदा चाहत्यांकडून लग्नाबाबत प्रश्न विचारला जातो. त्याच्या आयुष्यात एखादी खास व्यक्ती आहे का, हे जाणून घेण्याचीही अनेकांना उत्सुकता आहे. या सर्व विषयांवर त्याने अत्यंत प्रामाणिकपणे आपली भूमिका मांडली आहे.

‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत ललित म्हणाला, “मला लग्नसंस्थेविषयी काही अडचणी आहेत. एखाद्या व्यक्तीबरोबर आयुष्यभर राहा, असं कोणीही मला सांगितलेलं आवडत नाही. आपण वर्षानुवर्षे चालू असलेले नियम पाळत आहोत. परंतु समाजातील अनेक प्रथा चुकीच्या आहेत, ज्या बंद केल्या पाहिजेत. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही नका सांगू मी काय केलं पाहिजे. लग्न मी दुसऱ्यांना दाखवण्यासाठी करावं की स्वत:साठी? जर आम्ही दोघं आयुष्यात एकाच वळणावर असू आणि आम्ही एकमेकांसोबत आनंदी असू तर लग्न करण्यात काहीही गैर नाही.”

या मुलाखतीत जेव्हा ललितला विचारलं गेलं की तू लग्न करणार की नाही? तेव्हा त्यावर त्याने नकारार्थी उत्तर दिलं. “मी लग्न करणार नाही”, असं त्याने स्पष्ट केलं. “माझ्या आतापर्यंतच्या चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये मी लग्नाचे विधी इतक्या वेळा आणि इतक्या सुंदर पद्धतीने साकारल्या आहेत की खऱ्या आयुष्यात आता मला ते सगळं पुन्हा करण्याची गरज वाटत नाही. मी कॉलेजमध्ये असताना रिलेशनशिप्समध्ये होतो. मात्र मला आता एकटं राहायला जास्त आवडतं. मी बराच काळ एकटा राहत असल्यामुळे मला स्वत:ची सोबत खूप आवडते. मला एकांत आवडतं”, असं ललितने सांगितलं.

ललित प्रभाकरने ‘आनंदी गोपाळ’, ‘हंपी’, ‘स्माइल प्लीज’, ‘मीडियम स्पाइसी’, ‘झोंबिवली’, ‘आरपार’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.