
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव (Ramesh Deo) यांनी काल (2 फेब्रुवारी) वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र,बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती रमेश देव यांचे सुपुत्र अभिनेते अजिंक्य देव (Ajinkya Deo) यांनी दिली आहे. बुधवारी सकाळीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी 11 वाजता मुंबईतील (Mumbai)अंधेरीतील घरी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं . आता दुपारी अडीच वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. दुपारी अडीच वाजता पारसी वाडा, विलेपार्ले पूर्व इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव अनंतात विलीन झाले आहेत, रमेश देव यांच्या जाण्याने सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली आहे.
“ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या निधनाने मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीचा एक गौरवशाली अध्याय संपला आहे. देखणं व्यक्तिमत्त्व, अष्टपैलू अभिनयाच्या बळावर मराठी नाट्य-चित्रपट रसिकांच्या हृदयसिंहासनावर अनेक दशकं अधिराज्य करणारा महान कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. रमेश देव यांच्या अभिनयानं मराठी कलारसिकांच्या पिढ्यांना मनमुराद आनंद दिला. मराठी कलासृष्टी समृद्ध करण्याचं काम त्यांनी केलं. सीमा आणि रमेश देव यांचं वास्तवातलं तसंच पडद्यावरचं दांपत्यजीवन महाराष्ट्रासाठी आदर्शवत होतं. त्यांच्या निधनाने एक महान कलावंत, आदर्श माणूस काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्याचं निधन ही मराठी कलासृष्टीची मोठी हानी आहे. रमेश देव यांच्या कुटुंबियांच्या, रसिक चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. रमेश देव साहेबांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली…,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकभावना व्यक्त करीत त्यांना श्रध्दांजली वाहिली.
मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या सदाबहार अभिनयाची छाप उमटवणारा, मनस्वी असा अभिनेता आपण आज गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी एक उत्तम कलावंत म्हणून आयुष्यभर कलाक्षेत्राची सेवा केली.
शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचा परवाच वाढदिवस होता. शुभेच्छांचा ओघ सुरू असतानाच त्यांचे आपल्यातून जाणे दुःखदायक आहे. रमेश देव यांनी मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. दोन्हीकडे आपल्या अभिनयाची छाप उमटवली. त्यांचे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्नेहबंध होते. त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणातही संधी आजमावली होती.
चित्रपट सृष्टीत त्यांना आदराचे स्थान होते. देव कुटुंबीयांकडून कला क्षेत्राची अविरत सेवा सुरू आहे. दिवंगत रमेश देव हे कला क्षेत्रात दोन पिढ्यांना जोडणारा महत्त्वाचा आणि मार्गदर्शक असा दुवा होते. त्यांनी सदाबहार आणि मनस्वी कलाकार अशी प्रतिमा आयुष्यभर जपली. त्यांचे चित्रपट क्षेत्रातील योगदान विसरता येणार नाही असे आहे. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
रमेश देव यांच्या जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा, तब्बल 475 सिनेमात साकरल्या भूमिका
मराठीसोबत हिंदी सिनेमातही अनेक महत्त्वाच्या भूमिका रमेश देव यांनी वढवल्या होत्या. अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला होता. एक उत्तम अभिनेता, एक चांगला माणूस आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना रमेश देव यांच्या चाहत्यांमध्ये पसरली आहे.
रमेश देव यांच्या निधनावर अभिनेते सयाजी शिंदे यांनी बोलताना दुःख व्यक्त केलं आहे. 26 जानेवारी रोजी झालेल्या गप्पामध्ये रमेश देव यांनी आपल्याला शंभर वर्ष जगायचंय अशी इच्छा व्यक्त केली होती, असं सयाजी शिंदे यांनी सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जेष्ठ अभिनेते रमेश देव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या निधनाने मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतला उमदा तारा निखळला. कृष्ण-धवल काळापासून हिंदी चित्रपटांमध्येही अमीट ठसा उमवटणाऱ्या अभिनेत्यांपैकी ते एक. त्यांची सदाबहार व चैतन्यदायी प्रतिमा नव्वदीतही टिकून होती. स्व. रमेश देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली!”, असा भावना व्यक्त करत शरद पवार यांनी रमेश देव यांना आदरांजली वाहिली.
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या निधनाने मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतला उमदा तारा निखळला. कृष्ण-धवल काळापासून हिंदी चित्रपटांमध्येही अमीट ठसा उमवटणाऱ्या अभिनेत्यांपैकी ते एक. त्यांची सदाबहार व चैतन्यदायी प्रतिमा नव्वदीतही टिकून होती. स्व. रमेश देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 2, 2022
अभिनेता रमेश देव यांचा वयाचं 93 वर्षी निधन झालं. त्यांनी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरच्या श्वास घेतला. त्यांचा मुलगा व अभिनेता अजिंक्य देव यांनी म्हटले की, माझ्या वडिलांचं निधन झालं हा आमच्या सर्वांसाठी मोठा धक्का आहे. काही दिवसांपासून त्यांचा तब्येत ठीक नव्हती. सकाळी 11 वाजता अंधेरी त्यांचं घरी अंत्यदर्शनासाठी अभिनेते रमेश देव यांचं पार्थिव ठेवण्यात येणार आहे. दुपारी 2.30 वाजता पारसी वाडा विले पार्ले पूर्व येथे त्यांच्या अंत्यसंस्कार होणार आहे.