Mahavatar Narsimha on OTT : पुढील 24 तासांत बनणार नवे रेकॉर्ड; ‘महावतार नरसिम्हा’ची आता ओटीटीवर डरकाळी

Mahavatar Narsimha OTT Release : अश्विन कुमार दिग्दर्शित 'महावतार नरसिम्हा' हा सुपरहिट चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. थिएटरमध्ये जबरदस्त प्रतिसाद मिळवलेल्या या चित्रपटाने 'सैयारा'लाही मागे टाकलं होतं.

Mahavatar Narsimha on OTT : पुढील 24 तासांत बनणार नवे रेकॉर्ड; महावतार नरसिम्हाची आता ओटीटीवर डरकाळी
महावतार नरसिम्हा
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 19, 2025 | 8:27 AM

Mahavatar Narsimha OTT Release : अश्विन कुमार दिग्दर्शित ‘महावतार नरसिम्हा’ हा पौराणिक कथेवर आधारित असलेला ॲनिमेटेड चित्रपट 25 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या कथेनं, सिनेमॅटोग्राफीने आणि ॲनिमेशनने सर्वांची मनं जिंकली होती. आता 56 दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांना इतकं प्रभावित केलं होतं की थिएटरमध्येच भगवान नरसिम्हाचा जयघोष होऊ लागला होता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच वयोगटातील प्रेक्षक थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहू लागले होते आणि इतरांनाही तो पाहण्याचं आवाहन करत होते. आता हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या किंवा त्यांच्या मोबाइलवरही पाहता येणार आहे. ‘महावतार नरसिम्हा’च्या ओटीटी रिलीजची प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे.

जर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहू शकला नाहीत, तरी आता तुम्हाला तो घरबसल्या आरामात पाहता येणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मने गुरुवारी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर याबद्दलची माहिती दिली आहे. 19 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वाजल्यापासून हा चित्रपट संपूर्ण देशभरात स्ट्रीम होणार आहे. या चित्रपटात भक्त प्रल्हादची कथा दाखवण्यात आली आहे. ज्यांची भक्ती पाहून भगवान विष्णूने क्रूर दानवराज हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी नरसिंहाचा अवतार घेतला होता. ‘सॅकलनिक्ल’ने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाने जगभरात तब्बल 325.65 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर भारतात या चित्रपटाची कमाई 250.2 कोटी रुपये इतकी झाली होती.

या चित्रपटाला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादाबद्दल दिग्दर्शक अश्विन कुमार म्हणाले होते, “जेव्हा एखादा चित्रपट पहिल्याच आठवड्यात 100 कोटी रुपयांचा टप्पा पार करतो, तेव्हा खरंच हा एक वेगळाच आनंद असतो. इतक्या कमाईची आम्ही अपेक्षासुद्धा केली नव्हती. आपल्या देशात विविध धर्माचे आणि संस्कृतीचे लोक एकत्र राहतात. कदाचित याच विविधतेमुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला इतका भावला आहे. आम्ही प्रेक्षकांना एक वेगळा आणि ग्रँड ॲनिमेशनचा अनुभव दिला, जो भारतीय चित्रपटसृष्टीत फार क्वचित पहायला मिळतो. भारतात ॲनिमेशन चित्रपट हे लहान मुलांसाठीच असतात, असा अनेकांचा समज होता. परंतु आमच्या चित्रपटाने हाच विचार बदलला आहे.”