Mahesh Kothare : मी त्याला टाळलं…महेश कोठारे यांनी केलेली मोठी चूक, आलेला अशोक मामांसोबतच्या मैत्रीत दुरावा
Mahesh Kothare On Ashok Saraf : महेश कोठारे यांनी न सांगता अशोक सराफ यांना एका सिनेमातून काढलेलं. त्याबद्दल त्यांनी एका मुलाखतीत सांगितलेलं.

मराठी चित्रपटसृष्टीत महेश कोठारे, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या त्रिकुटाने एक काळ गाजवला. या कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेमाला नवी ओळख मिळवून दिली. ‘धुमधडाका’सारख्या सुपरहिट चित्रपटातून या कलाकारांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. मात्र, या चित्रपटाच्या यशानंतर महेश कोठारे आणि अशोक सराफ यांच्या मैत्रीत काहीसा दुरावा निर्माण झाला होता. आता अनेक वर्षांनंतर महेश कोठारे यांनी यामागचं कारण सांगत स्वतःची चूकही मान्य केली आहे.
महेश कोठारे यांनी सांगितलं काय घडलेलं?
‘लोकमत फिल्मी‘ला दिलेल्या मुलाखतीत महेश कोठारे म्हणाले होते की, ‘काही चूका माझ्याकडून झाल्या. मी त्या मान्य करतो यात शंकाच नाही. मला वाटत होतं ‘धुमधडाका’ सिनेमाला मिळालेल्या यशानंतर आपण नंतर जे प्रोजेक्ट्स करु त्यात महेश कोठारे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे हे त्रिकूट पाहिजेच पाहिजे, असंच अपेक्षित होतं. पण नंतर ज्या स्क्रीप्टवर आम्ही काम करत होतो अण्णासाहेब देऊळगांवकर तेव्हा माझ्याबरोबर होते. आम्ही एका स्क्रीनप्लेवर काम करत होतो, तेव्हा माझ्या लक्षात आलं की, अशोक सराफची जी भूमिका आहे त्याला मी न्याय देऊ शकत नाहीये.’
‘आपण अशोकला नुसतंच घ्यायचं म्हणून बोलतोय. पण, असं म्हणून मला घ्यायचं नव्हतं. म्हणून मी त्या काळात त्याला टाळलं. हे मी त्याला जाऊनल कळवायला पाहिजे होतं. पण ते न कळवताच मी काम सुरू केलं आणि इथेच मी चुकलो.’ असं महेश यांनी शेवटी सांगितलेलं.
महेश कोठारे यांनी आणखी एक रंजक किस्सा सांगितला. ‘खतरनाक’ चित्रपटासाठीही त्यांना अशोक सराफ यांना घ्यायचं होतं. त्यासाठी त्यांनी अशोक सराफ यांना स्क्रिप्ट वाचायला दिली होती. मात्र, ती कथा अशोक सराफ यांना फारशी आवडली नाही. त्यामुळे त्यांनी हा चित्रपट करण्यास नकार दिला. त्यानंतर महेश कोठारे यांनी त्या भूमिकेसाठी जॉनी लिव्हर यांची निवड केली. हा चित्रपटही सुपरहिट ठरला.
