‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाच्या वादावर महेश मांजरेकरांचा मोठा खुलासा; थेट म्हणाले…

'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादावर लेखक आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी मौन सोडलं आहे. या चित्रपटाचा वाद आता कोर्टात पोहोचला आहे. 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मी शिवाजीराजे भोसले बोलतेय'चा हा सीक्वेल नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाच्या वादावर महेश मांजरेकरांचा मोठा खुलासा; थेट म्हणाले…
Mahesh Manjrekar on Punha Shivajiraje Bhosle
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 19, 2025 | 9:31 AM

महेश मांजरेकरांच्या आगामी ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटावरून वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात आणि दिग्दर्शक मांजरेकरांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. या दाव्यात बंधनकारक कराराचं उल्लंघन, कॉपीराइट्सचं उल्लंघन आणि जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याच गंभीर आरोप करण्यात आला आहे. या आरोपांवर आता महेश मांजरेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. “‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा आमचा चित्रपट केवळ एक ऐतिहासिक कथा नाही, तर ती महाराष्ट्राच्या आत्म्याला स्पर्श करणारी भावना आहे. या चित्रपटाचा कोणत्याही पूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाशी थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही. हा सीक्वेल, प्रीक्वेल किंवा दुसरा भाग नाही. हा चित्रपट पूर्णपणे स्वतंत्र, मौलिक आणि आमच्या मनातून, आमच्या श्रद्धेतून जन्माला आलेला आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

महेश मांजरेकरांचं स्पष्टीकरण

“आम्ही हे सर्व आमच्या प्रसिद्धी उपक्रमांमधून, माध्यमांमधून आणि संवादांमधून स्पष्टपणे सांगितलं आहे. मराठी प्रेक्षक हे सुजाण, जाणकार आणि संवेदनशील आहेत. इतिहासाविषयी त्यांचं प्रेम आणि अभिमान आम्हालाही प्रेरणा देतो. त्यामुळे प्रेक्षकांची दिशाभूल करण्याचा किंवा चुकीचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न आमच्याकडून कधीच झालेला नाही आणि होणारही नाही. या चित्रपटाच्या कथेत आम्ही एका गहिऱ्या भावनेला आकार दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज 1680 नंतर पुन्हा एकदा या पवित्र महाराष्ट्रभूमीवर अवतरतात. ही केवळ कल्पना नाही, तर प्रत्येक मराठी माणसाच्या अंतःकरणात पेटलेली एक ज्वाला आहे. ‘राजे पुन्हा येतील, आपल्या मातीचा सन्मान पुन्हा प्रस्थापित करतील’ याच भावना, या संकल्पनेतूनच आमच्या चित्रपटाला ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हे नाव मिळालं आहे,” असं मांजरेकर म्हणाले.

याविषयी ते पुढे म्हणाले, “अलीकडे एका निर्मितीसंस्थेनं असा दावा केला आहे की या चित्रपटामुळे त्यांच्या बौद्धिक अधिकाराचं उल्लंघन झालं आहे. मात्र, आम्ही स्पष्ट सांगू इच्छितो की हे सर्व आरोप पूर्णपणे निराधार, तथ्यहीन आणि चुकीचे आहेत. आमचं कथानक, पात्रं आणि मांडणी ही सर्वस्वी मौलिक आहे. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व नाहीत, ते आमचे प्रेरणास्थान, आमचा अभिमान आणि आमचा श्वास आहेत. त्यांच्या पराक्रमाची गाथा, त्यांच्या विचारांचा वारसा आणि त्यांच्या नेतृत्वाची जाणीव आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे आमचं कर्तव्य आणि सौभाग्य आहे.”

”पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटामागचा आमचा हेतू एकच आहे. शिवरायांचा पराक्रम, त्यांचा आदर्श आणि त्यांचा न्यायप्रिय स्वभाव नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं. हा प्रयत्न कोणाच्याही आडकाठीशिवाय, कुठल्याही भीतीशिवाय आणि संपूर्ण प्रामाणिकपणे सुरू राहील. कारण, शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नाहीत ते संपूर्ण हिंदुस्थानाचे दैवत आहेत आणि त्यांच्या कथा सांगण्याचा अधिकार प्रत्येक भारतीयाला आहे,’ अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली आहे.