Mahesh Tilekar : अंथरुणाला खिळलेली, एकदम शांत, ओळख विसरलेली…महेश टिळेकरांनी सांगितली मधू कांबीकर यांची आठवण

Mahesh Tilekar On Madhu Kambikar : महेश टिळेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मधू कांबीकर यांची आठवण शेअर केली आहे.

Mahesh Tilekar : अंथरुणाला खिळलेली, एकदम शांत, ओळख विसरलेली...महेश टिळेकरांनी सांगितली मधू कांबीकर यांची आठवण
| Updated on: Oct 12, 2026 | 2:13 PM

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री मधू कांबीकर यांचं आज वयाच्या 73व्या वर्षी निधन झालं. अनेक कलाकारांनी अभिनेत्रीला श्रद्धांजली अर्पण केली आहे. अशातच आता मराठी दिग्दर्शक आणि निर्माते महेश टिळेकर यांनी मधू कांबीकर यांची आठवण शेअर केली असून सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

महेश टिळेकर यांची पोस्ट

Loading...

महेश टिळेकर यांनी मधू कांबीकर यांच्यासोबतचे फोटो शेअर करत लिहिलं की, ‘भावपूर्ण श्रद्धांजली, मधु कांबीकर…कुशल नृत्यांगना, कसदार अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या बरोबर अनेक शो, मालिका, टीव्ही ॲड केल्या.अनेकदा त्यांच्या घरी जाण्याचा योग आला. लावणी नृत्य कोळून पायलेली ही अद्भुत नृत्यांगना. लावणीचा घरंदाजपणा जपण्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन त्यांनी तयार केलेला ‘सखी माझी लावणी’ ह्या कार्यक्रमातून पारंपरिक लावण्या वर नृत्य करताना त्यांना पाहून थक्क व्हायला व्हायचं. मराठी तारका या माझ्या कार्यक्रमात पहिल्या शो पासून त्यांचा सहभाग होता.’

‘माझ्या टीव्ही मालिकांमध्ये पण त्यांनी अभिनय केला. मी केलेल्या एका सामाजिक संदेश देणाऱ्या गाण्यात आणि गणपतीच्या आरती मध्ये त्यावेळच्या त्यांच्या समकालीन आणि काही सिनियर,अभिनेत्रींना मी एकत्र आणलं होतं, शूटिंगच्या दिवशी त्यांच्या समकालीन असलेल्या एका दुसऱ्या अभिनेत्री बरोबर त्याचं कधी पटलं नव्हतं, दोघींमध्ये खूप शीतयुद्ध होतं..तिला पाहताच, तिच्या बरोबर काम करायचं म्हटल्यावर सुरुवातीला त्या नाराज झाल्या. पण, मी हक्काने त्यांना ‘मधु ताई, जाऊ देना जुनं सगळं, माझ्यासाठी तुम्ही काम करायचं’ असा आग्रह केल्यावर गालातल्या गालात हसत त्या ‘महेश तू ना फार जिद्दी आहे’, असं त्या म्हणाल्या. क्षणाचाही विलंब न लावता, जिच्याशी त्याचं पटायचं नाही त्या अभिनेत्रीला मी हाताला धरून त्यांच्या समोर घेऊन आल्यावर, ‘बघितलं कसा आहेस महेश, तुला मस्त कलरची साडी दिली आणि मला बघ हा कलर..’ अशी प्रेमळ तक्रार मधुताई त्या अभिनेत्री पुढे करू लागल्या, मधुताई तुम्ही इतक्या सुंदर आहात की तुम्हाला कुठलाही कलर शोभून दिसतो. असं मी बोलल्यावर पुन्हा एखाद्या तरुणीसारख्या त्या लाजल्या आणि ‘महेश, तू असं प्रत्येक अभिनेत्रीला सांगतो ना?’ असं मला विचारत त्या दोघी हसू लागल्या.’

‘निळू भाऊ, कुलदीप पवार ,आशा काळे ,विजय चव्हाण यांना घेऊन मी एक टीव्ही ॲड केली होती. तेव्हा तर हे सगळे दिग्गज कलाकार एकत्र असताना ज्या गप्पा, मस्ती आम्ही केली ते विसरता येणारं नाही..अविस्मरणीय अशा त्या आठवणी आहेत. त्या अंथरुणाला खिळून असताना दोनदा त्यांना भेटायला घरी गेलो होतो. देखणं रूप असलेली सदाबहार अभिनेत्री एकदम शांत, ओळख विसरलेली कोण आलं गेलं काहीच त्यांना कळत नव्हतं..त्यांचा मुलगा आणि सून तिथे होते त्यांनी सांगितलं की, घुंगरू, ढोलकीच्या थाप मात्र ऐकल्यावर जरासं हात, बोटं त्या हलवतात..ते ऐकूनच काळजात चर्र झालं.’

 

‘नृत्य जिचा प्राण आहे त्या अभिनेत्रीवर अशी वेळ यावी हे दुर्दैव पण कसलीही तक्रार,किरकिर न करता त्यांची श्रावण बाळासारखी सेवा करणारा त्यांचा मुलगा प्रीतम याला खरंच दंडवत. भावपूर्ण श्रद्धांजली मधुताई’ असं महेश टिळेकर यांनी शेवटी म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us