
योग्य वेळी निदान आणि योग्य उपचार यांमुळे अभिनेत्री महिमा चौधरीने ब्रेस्ट कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. कॅन्सरचं योग्य वेळी निदान होणं किती महत्त्वाचं असतं, यावर तिने अधिक भर दिला. महिमा ‘यंग वुमेन ब्रेस्ट कॅन्सर कॉन्फरन्स 2025’मध्ये उपस्थित होती. या कॉन्फरन्समध्ये महिमाला तिचा प्रवास इतरांसमोर मोकळेपणे मांडण्यासाठी आमंत्रित केलं होतं. 2022 मध्ये महिमाला कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यावेळी महिमाला कॅन्सरची कोणतीच लक्षणे नव्हती. रुटीन चेकअपसाठी गेली असता तिला अचानक कॅन्सरचं निदान झाल्याचं तिने सांगितलं.
‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत महिमा म्हणाली, “मला कॅन्सरची कोणतीच लक्षणे जाणवत नव्हती. मी ब्रेस्ट कॅन्सरच्या स्क्रिनिंगलाही गेले नव्हते. मी फक्त वार्षिक रुटीन चेकअप करण्यासाठी गेले होते. मला ब्रेस्ट कॅन्सर झालाय हे मलाच माहीत नव्हतं. कॅन्सर हा एक असा आजार आहे, जो तुम्ही स्वत:च ओळखू शकत नाही. ते फक्त चाचण्यांद्वारेच कळू शकतं. त्यामुळे जर तुम्ही रुटीन चेकअप करत असाल तर कॅन्सरचं निदान लवकर होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही उपचारसुद्धा लवकर घेऊ शकता.”
भारतात कॅन्सरवरील उपचार किती बदललंय आणि त्याची औषधं किती स्वस्तात मिळू लागली आहेत, याविषयीही तिने सांगितलं. “जवळपास तीन ते चार वर्षांपूर्वी मला कॅन्सरचं निदान झालं होतं. तेव्हाच्या आणि आताच्या भारतातीत उपचार पद्धतीमध्ये खूप फरक आहे. अनेक औषधं आता स्वस्त झाली आहेत. फार्मास्युटिकल कंपन्यांकडून तुम्हाला चांगली मदत मिळतेय. कॅन्सरविषयी आता जागरुकताही खूप वाढली आहे. जे लोक कॅन्सरचा सामना करत आहेत, त्यांचा प्रवास ऐकून मला खूप प्रेरणा मिळते”, अशा शब्दांत ती व्यक्त झाली.
2022 मध्ये कॅन्सरचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर महिमा चौधरीच्या पायाखालची जमीन सरकली होती. “मला असं वाटलं की माझं अख्खं जगच बदललं आहे. माझी सर्व आंतरिक शक्ती संपली आहे. पण नंतर मी स्वत:ला सावरलं आणि धैर्याने त्या आजाराचा सामना केला. आता बदल सर्वांसमोर आहे”, असं ती एका मुलाखतीत म्हणाली होती.