
अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर ती अभिनेता अर्जुन कपूरच्या प्रेमात पडली. या दोघांच्या वयातील 12 वर्षांच्या अंतरामुळे कायम हे नातं चर्चांच्या केंद्रस्थानी राहिलं. जवळपास सहा वर्षांच्या डेटिंगनंतर त्यांनी ब्रेकअपचा निर्णय घेतला. 2024 मध्ये अर्जुन आणि मलायका यांच्या नात्यात फूट पडली. त्यानंतर जेव्हा कधी दोघं सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकमेकांसमोर आले, तेव्हा कधी एकमेकांना दुर्लक्ष करताना तर कधी एकमेकांशी मैत्रीपूर्ण वागताना दिसले. मलायकाच्या वडिलांचं निधन झालं, तेव्हा अर्जुन तिच्या पाठिशी खंबीरपणे उभा असल्याचं पहायला मिळालं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मलायका तिच्या आयुष्यातील अर्जुनच्या स्थानाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.
‘द नम्रता जकारिया शो’मध्ये मलायकाने तक्रार केली की लोक तिच्या खासगी आयुष्यात एका मर्यादेपेक्षा अधिक वाकून पाहण्याचा प्रयत्न करतात. याला तिने ‘बॉर्डलाइन वॉयरिज्म’ असं म्हटलंय. “मला असं वाटतं की राग आणि दु:ख हे प्रत्येकाच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर येतातच. आपण सर्वजण मनुष्यप्राणी आहोत आणि प्रत्येकजण कधी ना कधी राग, निराशा, दु:ख यांचा सामना करतो. परंतु वेळेनुसार या गोष्टी बदलतात. ही गोष्ट कितीही रटाळ वाटत असली तरी वेळेनुसार सर्व गोष्टी ठीक होतात”, असं ती म्हणाली.
याविषयी ती पुढे म्हणाली, “काहीही झालं तरी, अर्जुन माझ्या आयुष्याचा खूप महत्त्वाचा भाग आहे. मला माझ्या भूतकाळाबद्दल किंवा भविष्याबद्दल जास्त बोलायचं नाहीये. त्याबद्दल आधीच बरंच काही लिहिलं आणि दाखवलं गेलं आहे. माझं वैयक्तिक जीवन म्हणजे माध्यमांसाठी एक खाद्यपदार्थ बनलं आहे, जे सतत चघळलं जातं. मी नेहमी म्हणते की हा या कामाचा भाग आहे. लोकांना इतकांच्या आयुष्यात डोकावून बघण्याची सवयच झाली आहे. त्यातही तुम्ही या इंडस्ट्रीत काम करत असाल, तर तुम्हाला हे सर्व सहन करण्यासाठी तयारच राहावं लागतं. परंतु आपल्या खासगी आयुष्यातील किती भाग आपण सार्वजनिक करायचं हे निश्चित करण्याचा अधिकार आपल्याला असायला हवा. सध्याच्या काळात तर शिंकणंसुद्धा बातमी बनते. सर्वांना सर्वकाही समजतं.”
मलायका आणि अर्जुन यांनी 2018-2019 मध्ये एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. परंतु नंतर नेटकऱ्यांनीही त्यांच्या जोडीला पसंती दिली. मात्र मलायका आणि अर्जुनचं नातं फक्त सहा वर्षेच टिकू शकलं.