मलायकाच्या वडिलांची आत्महत्या नव्हे तर..; मुंबई पोलिसांची मोठी माहिती

अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांनी इमारतीवरून उडी मारून आयुष्य संपवल्याची बातमी समोर आली आहे. आता मुंबई पोलिसांनी याप्रकरणी अत्यंत मोठी अपडेट दिली आहे.

मलायकाच्या वडिलांची आत्महत्या नव्हे तर..; मुंबई पोलिसांची मोठी माहिती
अनिल अरोरा, मलायका अरोरा आणि जॉइस पॉलिकार्प
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 11, 2024 | 4:13 PM

अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांनी आज (11 सप्टेंबर) सकाळी मुंबईतल्या वांद्रे इथल्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली. अनिल अरोरा हे वांद्रेमधली अलमेडा पार्क इथं राहायचे. त्यांनी सहाव्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी माहिती दिली आहे. अनिल यांनी आत्महत्या केली नसून ते सहाव्या मजल्यावरील बाल्कनीमधून खाली पडले, असं पोलीस म्हणतायत. याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.

‘मिड डे’ या वेबसाइटला पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल अरोरा हे बाल्कनीजवळ उभे होते आणि ते अचानक खाली पडले. त्यानंतर स्थानिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. अनिल अरोरा हे 80 वर्षांचे होते. त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना होता. मात्र ते बाल्कनीच्या ग्रिलची उंची कमी असल्याने त्यांचा तोल जाऊन खाली पडले का, याचा तपास पोलीस करत आहेत.

अनिल अरोरा हे मर्चंट नेवीमध्ये काम करायचे. मलायका 11 वर्षांची असतानाच तिचे आईवडील विभक्त झाले होते. गेल्या वर्षी अनिल यांना मुंबईतील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांना आरोग्याची कोणती समस्या होती, याविषयीची माहिती समोर आली नव्हती. मलायका काही कामानिमित्त पुण्यात होती. वडिलांच्या निधनाविषयी कळताच ती तातडीने मुंबईसाठी रवाना झाली आहे. तर दुसरीकडे तिचा पूर्व पती आणि अभिनेता अरबाज खान अनिल यांच्या निवासस्थानावर पोहोचला आहे.

एका मुलाखतीत मलायका तिच्या बालपणाविषयी आणि आईवडिलांच्या घटस्फोटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली होती. “माझं बालपण खूप छान होतं, पण ते सोपं नव्हतं. किंबहुना माझ्या भूतकाळाचं वर्णन मी ‘गोंधळ’ या शब्दाने करेन. पण कठीण काळच तुम्हाला आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे धडे शिकवतो”, असं ती म्हणाली होती. मलायका अरोराने लग्नाच्या 19 वर्षांनंतर अरबाज खानला घटस्फोट दिला. 2017 मध्ये हे दोघं विभक्त झाले होते. या दोघांना अरहान हा मुलगा आहे.