ममता कुलकर्णीचा डान्स पाहून नेटकरी थक्क; म्हणाले ’54 व्या वर्षीही तरुण अभिनेत्रींना टक्कर’
अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये ती 'सबसे बडा खिलाडी' या चित्रपटातील 'भोली भाली लडकी' या गाजलेल्या गाण्यावर नाचताना दिसत आहे.

नव्वदच्या दशकात आपल्या अभिनय आणि ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी कारण तिचा कोणता नवा चित्रपट नाही, तर तिचा व्हायरल झालेला डान्स व्हिडीओ आहे. अध्यात्माच्या मार्गावर जात संन्यास स्वीकारल्यानंतर भगव्या वस्त्रांमध्ये दिसणारी ममता जयपूरमधील एका कार्यक्रमात चक्क तिच्या जुन्या चित्रपटातील गाण्यांवर थिरकताना दिसली. तिचा हा अंदाज पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत.
ममता कुलकर्णी शुक्रवारी, 25 सप्टेंबर रोजी जयपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. राजस्थान फिल्म फेस्टिव्हलशी संबंधित या कार्यक्रमात ती प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित होती. कार्यक्रमादरम्यान तिच्या जुन्या चित्रपटातील गाणी वाजवण्यात आली आणि त्यानंतर ममताने स्टेजवर येत ठेका धरला. विशेष म्हणजे ‘करण अर्जुन’ या चित्रपटातील लोकप्रिय ‘भांगडा पाले’ या गाण्यावर ममताने डान्स केला. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ममताने केवळ ‘करण अर्जुन’च नव्हे, तर ‘सबसे बड़ा खिलाडी’ आणि ‘घातक’ यांसारख्या तिच्या गाजलेल्या चित्रपटांमधील गाण्यांवरही परफॉर्म केल्याचं समोर आलं आहे. कार्यक्रमातील तिचा लूकही चर्चेचा विषय ठरला. गेल्या काही काळात ममताला साध्वीच्या रूपात पाहण्याची सवय झालेल्या चाहत्यांना तिचा हा ग्लॅमरस अंदाज काहीसा अनपेक्षित वाटला.
पहा व्हिडीओ-
विशेष म्हणजे काही काळापूर्वी जन्माष्टमीच्या कार्यक्रमात ममताला तिच्याच ‘करण अर्जुन’ चित्रपटातील एका गाण्यावर डान्स करण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र त्यावेळी तिने डान्स करण्यास नकार दिला होता. त्या वेळी तिने आपल्या जुन्या फिल्मी व्यक्तिमत्त्वापासून आपण दूर गेल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आता जयपूरमधील कार्यक्रमात तिचा पुन्हा स्टेजवर डान्स करतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ममता कुलकर्णीने याच कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवादही साधला. आवडतं काम करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत बसू नका, जे काम कराल ते पूर्ण मनापासून करा, असा सल्ला तिने विद्यार्थ्यांना दिला. तिच्या या संदेशाचीही चर्चा झाली.
ममताचा व्हिडीओ पाहून सोशल मीडिया युजर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही चाहत्यांनी तिचा जुना अंदाज पाहून आनंद व्यक्त केला, तर काहींनी संन्यास घेतल्यानंतर ती पुन्हा अशा प्रकारे डान्स करताना दिसल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले. काही चाहत्यांनी तर तिने पुन्हा अभिनयाच्या दुनियेत परतावं, अशी इच्छा व्यक्त केली आहे.