“जणू ऑलिम्पिक मेडलच जिंकले..”; महामंडलेश्वर बनल्यानंतर ममता कुलकर्णीची प्रतिक्रिया

अभिनेत्री ममता कुलकर्णी आता किन्नर अखाड्याची महामंडलेश्वर बनल्यानंतर श्री यमाई ममता नंद गिरी या नावाने ओळखली जात आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ममता तिच्या या निर्णयाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

जणू ऑलिम्पिक मेडलच जिंकले..; महामंडलेश्वर बनल्यानंतर ममता कुलकर्णीची प्रतिक्रिया
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 28, 2025 | 8:46 AM

अभिनेत्री ममता कुलकर्णीने संन्यास घेतला असून प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या ‘महाकुंभ 2025’मध्ये ती किन्नर अखाड्याची महामंडलेश्वर बनली आहे. 52 वर्षीय ममता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीतत याबद्दल मोकळेपणे व्यक्त केली. 23 वर्षांच्या या परिवर्तनकारी प्रवासानंतर महामंडलेश्वर बनण्याचा मान मिळाल्याबद्दल तिने आभार मानले. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत ममता म्हणाली, “किन्नर अखाड्याचे लोक शंकर आणि पार्वती यांच्या अर्धनारेश्वर अवताराचं प्रतिनिधीत्व करतात. 23 वर्षांच्या अध्यात्मिक प्रवासानंतर अशा अखाड्याचं महामंडलेश्वर बनणं म्हणजे मला जणू ऑलिम्पिक मेडल जिंकल्यासारखं वाटतंय.”

यावेळी ममताला पुन्हा चित्रपटांमध्ये काम करणार का, असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ती पुढे म्हणाली, “मी पुन्हा चित्रपटात काम करण्याची कल्पनासुद्धा करू शकत नाही. माझ्यासाठी सध्या ही गोष्ट पूर्णपणे अशक्यच आहे.” ममता कुलकर्णीने महामंडलेश्वर बनण्यासाठी किन्नर अखाडाच का निवडला, असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्याचंही उत्तर ममातने या मुलाखतीत दिलंय. “देवी आदिशक्तीच्या आशीर्वादामुळेच मला हा मान मिळाला आहे. किन्नर अखाडा हे स्वातंत्र्याचं प्रतिनिधीत्व करतं, म्हणून मी त्याचा भाग बनण्याचा निर्णय घेतला. इथे कोणतीच बंधनं नाहीत”, असं ममताने स्पष्ट केलं.

ममता कुलकर्णीने तिच्या फिल्मी करिअरमध्ये शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांसारख्या मोठमोठ्या कलाकारांसोबत काम केलंय. इतकंच नव्हे तर न्यूड फोटोशूटमुळे ती चर्चेत होती. मनोरंजन विश्वाकडून अचानक अध्यात्माकडे जाण्याच्या निर्णयाबद्दल ममतातने सांगितलं, “मनोरंजनासोबतच तुम्हाला आयुष्यात प्रत्येक गोष्टीची गरज असते. तुम्ही त्या गरजा स्वीकारल्या पाहिजेत. पण अध्यात्म हे केवळ नशिबानेच तुम्हाला मिळतं. सिद्धार्थ (राजकुमार सिद्धार्थ गौतम जे नंतर गौतम बुद्ध बनले) यांनीसुद्धा त्यांच्या आयुष्यात सर्वकाही पाहिलं आणि त्यानंतर त्यांनी बदलण्याचा निर्णय घेतला.”

महामंडलेश्वर बनण्याआधी ममतालाही अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागलं होतं. चार अध्यात्मिक गुरुंकडून तिला असंख्य प्रश्न विचारण्यात आले होते. आयुष्य आणि अध्यात्म यांच्याप्रती ती किती समर्पित आहे, याची परीक्षा घेतली गेली. अखेर जेव्हा ममताच्या उत्तरांनी ते प्रभावित झाले, तेव्हा तिला महामंडलेश्वर बनण्याची संधी मिळाली, असं तिने सांगितलं.