प्रसिद्ध अभिनेत्रीला मॉलमध्ये चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न, व्हिडीओ पाहताच संतापले चाहते

प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत मॉलमध्ये ही घटना घडली असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. या अभिनेत्रीला एका व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रसिद्ध अभिनेत्रीला मॉलमध्ये चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न, व्हिडीओ पाहताच संतापले चाहते
अभिनेत्री नव्या नायर
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 16, 2025 | 10:24 AM

मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नव्या नायरसोबत नुकतीच एक अशी घटना घडली, ज्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. 39 वर्षीय नव्या तिच्या आगामी ‘पथिरात्री’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोझिकोड इथल्या एका शॉपिंग मॉलमध्ये पोहोचली होती. यावेळी गर्दीचा फायदा घेत एका व्यक्तीने तिला चुकीच्या पद्धतीने स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी नव्याच्या सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित केला आहे.

नव्या नायर तिच्या टीमसोबत मॉलच्या बाहेर जात होती, त्यावेळी तिच्यासोबत ही घटना घडली. तिच्या आजूबाजूला अनेकांनी घोळका केला होता. अशातच एका व्यक्तीने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सहकलाकार सौबिन शाहिरने लगेच त्या व्यक्तीचा हात पकडला आणि त्याला झटकलं. या व्हायरल व्हिडीओमध्ये नव्या आणि सौबिन त्या व्यक्तीकडे अत्यंत रागाच्या नजरेनं बघताना दिसत आहेत. या व्हिडीओच्या कमेंट्समध्ये नेटकऱ्यांनी नव्याच्या सुरक्षेवरून सवाल केला आहे. जर सेलिब्रिटींसोबत असं होत असेल तर सर्वसामान्यांनी काय करावं, असं एकाने म्हटलंय. तर गर्दीचा फायदा उचलणाऱ्या पुरुषांना कठोर शिक्षा दिली पाहिजे, अशी मागणी दुसऱ्याने केलीये.

केरळची नव्या नायर गेल्या 25 वर्षांपासून मल्याळम सिनेसृष्टीत कार्यरत आहे. तिने मल्याळमशिवाय तमिळ भाषेतील चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. नव्याने 2001 मध्ये ‘इष्टम’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तिने ‘नंदनम’, ‘मजहथुल्लिकिलुक्कम’, ‘कुंजिकूनन’, ‘कल्याणरमन’, ‘वेल्लीथिरा’, ‘ग्रामोफोन’, ‘कन्ने मदनगुका’ आणि ‘ओरुथी’ यांसारऱ्या चित्रपटांमध्ये काम केलं.

पहा व्हिडीओ

नव्या तिच्या दमदार अभिनयकौशल्यासाठी ओळखली जाते. तिने दोन वेळा केरळ राज्य चित्रपट पुरस्कारसुद्धा जिंकला आहे. तिच्या आगामी ‘पथिरात्री’ या चित्रपटाचं दिग्दर्शन रथीना यांनी केलंय. 2022 मध्ये त्यांनी ममूटी यांच्या ‘पुझी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. ‘पथिरात्री’मध्ये नव्या आणि सौबिन यांच्यासोबतच ऑगस्टीन, सनी वेन, अथमिया राजन, सबरीश वर्मा, हरिश्री अशोकन, अच्युथ कुमार, इंद्रान्स आणि थेजस यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर 17 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.