‘सैय्यारा’ पाहताना थिएटरमध्ये जोरजोरात ओरडू लागला तरुण; व्हिडीओची जोरदार चर्चा

'सैय्यारा' या चित्रपटाची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुण थिएटरमध्ये शर्टलेस होऊन जोरजोरात ओरडताना दिसत आहे. 'सैय्यारा'च्या स्क्रिनिंगदरम्यान ही घटना घडली आहे.

सैय्यारा पाहताना थिएटरमध्ये जोरजोरात ओरडू लागला तरुण; व्हिडीओची जोरदार चर्चा
Saiyaara
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 22, 2025 | 10:44 AM

अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या करिअरमधील पहिल्यावहिल्या ‘सैय्यारा’ या चित्रपटाने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आणि अवघ्या चार दिवसांत कमाईचा आकडा 100 कोटींच्या वर पोहोचला आहे. या चित्रपटाविषयी बरेच व्हिडीओ, रील्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये त्याच्याविषयी अधिक कुतूहल निर्माण झालं आहे. सर्वसामान्य प्रेक्षक तर या चित्रपटाचं कौतुक करतच आहेत, परंतु त्यात आता सेलिब्रिटींचीही भर पडली आहे. दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूने ‘सैय्यारा’ हा चित्रपट पाहिला आणि त्यातील अहान-अनितचं त्याने तोंडभरून कौतुक केलं. मोहित सुरी दिग्दर्शित या चित्रपटाच्या यशाने सर्वांना चकीत केलं आहे.

‘सैय्यारा’च्या यशामागचं एक मोठं कारण ‘माऊथ पब्लिसिटी’ आणि सोशल मीडिया म्हटलं जात आहे. मोठ्या प्रमाणावर लोक याच्याविषयी चर्चा करू लागल्याने, त्याविषयी प्रचंड कुतूहल निर्माण झालं आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर या चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यानचे बरेच व्हिडीओ व्हायरल होत आहेत. नुकताच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये एक व्यक्त थिएटरमध्ये जोरजोरात ओरडताना दिसत आहे. हा व्यक्ती थिएटरमध्ये शर्टलेस उभा आहे आणि तो छाती बदडून ओरडताना पहायला मिळत आहे. त्यानंतर तो अचानक बेशुद्ध होतो.

‘सैय्यारा’ या चित्रपटातील एका गाण्यामुळे तो इतका भावूक झाल्याचं म्हटलं जात आहे. थिएटरमधील स्क्रीनवर हे गाणं पाहून तो व्यक्ती शर्ट काढतो आणि त्यानंतर ओरडून लागतो. त्याच्यासोबत थिएटरमध्ये उपस्थित असलेले इतर प्रेक्षकसुद्धा ओरडताना दिसत आहेत. हा थिएटर कोणता आणि कुठे होता, याबद्दलची माहिती समोर आली नाही. परंतु या व्हिडीओने सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधलंय.

18 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 25 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. ‘यशराज फिल्म्स’ने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 9.75 लाख लोकांनी पहिल्याच दिवशी हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहिला. नव्या कलाकारांच्या चित्रपटासाठी ही सर्वांत मोठी ओपनिंग मानली जात आहे. या चित्रपटातून अहान आणि अनित यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.