Saiyaara : अहान पांडेच्या ‘सैय्यारा’ने प्रेक्षकांना लावलं वेड; रेकॉर्डब्रेक कमाई
अहान पांडे आणि अनित पड्डा या नवोदित कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेला 'सैय्यारा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करतोय. सोमवारीसुद्धा या चित्रपटाने जबरदस्त कमाई करत विक्रम रचला आहे.

‘सैय्यारा’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच असून सोमवारीही जबरदस्त कमाई झाली. सोमवार हा चित्रपटाच्या कमाईच्या बाबतीत निराशाजनक वार मानला जातो. परंतु यादिवशीही ‘सैय्यारा’ने दमदार कामगिरी केली आहे. मोहित सुरी दिग्दर्शित या चित्रपटातून अहान पांडे आणि अनित पड्डा या दोन नव्या कलाकारांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. अहान पांडे हा अभिनेत्री अनन्या पांडेचा चुलत भाऊ आहे. प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी या चित्रपटाने 22.50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. आतापर्यंत या चित्रपटाची कमाई 106 कोटी रुपये झाली आहे.
18 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 25 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. ‘यशराज फिल्म्स’ने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 9.75 लाख लोकांनी पहिल्याच दिवशी हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहिला. नव्या कलाकारांच्या चित्रपटासाठी ही सर्वांत मोठी ओपनिंग मानली जात आहे. या चित्रपटाने 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धडक’चाही विक्रम मोडला आहे. जान्हवी कपूरच्या ‘धडक’ने 8.76 कोटी रुपयांची कमाई केली होती. इतकंच नव्हे तर गेल्या काही वर्षांत प्रदर्शित झालेल्या रोमँटिक चित्रपटांपेक्षाही ‘सैय्यारा’ने चांगली कामगिरी केली आहे.
रोमँटिक चित्रपटांची पहिल्या दिवसाची कमाई
- रॉकी और रानी की प्रेम कहानी- 11.1 कोटी रुपये
- तेरी बातों में ऐसा उलझा जिया- 6.7 कोटी रुपये
- तू झूठी मैं मक्कार- 15.73 कोटी रुपये
- कबीर सिंग- 20.21 कोटी रुपये
‘सैय्यारा’ या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांनी सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. त्यामुळे ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा चांगली झाली होती. याच बुकिंगमधून पहिल्या दिवशी 9.39 कोटी रुपयांची कमाई झाली होती. तर 3.8 लाख तिकिटं ॲडव्हान्समध्ये विकली गेली होती. 2000 मध्ये ‘कहो ना प्यार है’ आणि ‘रेफ्युजी’ या चित्रपटांनंतर ‘सैय्यारा’साठी इतक्या मोठ्या प्रमाणावर म्हणजेच रेकॉर्डब्रेक ॲडव्हान्स बुकिंग झाली.
‘सैय्यारा’ने पहिल्या 2 दिवसांत कोणकोणत्या चित्रपटांना टाकलं मागे?
- आझाद – 22 कोटी रुपये
- केसरी वीर – 1.88 कोटी रुपये
- आंखो की गुस्ताखियाँ – 1.74 कोटी रुपये
- मेरे हसबंड की बिवी – 12.25 कोटी रुपये
- द भूतनी – 12.52 कोटी रुपये
- लवयापा – 7.69 कोटी रुपये
- माँ – 38.51 कोटी रुपये
- द डिप्लोमॅट – 40.73 कोटी रुपये
- सनम तेरी कसम (री-रिलीज) – 35.55 कोटी रुपये
- इमर्जन्सी – 20.48 कोटी रुपये
