‘या’ प्रश्नाचं उत्तर देऊन मनिकाने जिंकला ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2025’चा किताब

राजस्थानची मनिका विश्वकर्मा यंदाच्या 'मिस युनिव्हर्स इंडिया' स्पर्धेत विजेती ठरली. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिला एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाच्या उत्तरामुळेच मनिकाने हा किताब पटकावला आहे. हा प्रश्न कोणता होता, ते जाणून घ्या..

या प्रश्नाचं उत्तर देऊन मनिकाने जिंकला मिस युनिव्हर्स इंडिया 2025चा किताब
मनिका विश्वकर्मा
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 19, 2025 | 12:21 PM

जयपूरमध्ये 18 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या सौंदर्यस्पर्धेत राजस्थानच्या मनिका विश्वकर्माने ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2025’चा किताब पटकावला आहे. गतविजेती रिया सिंहाने तिला आपला मुकूट सोपविला. तर उत्तर प्रदेशची तान्या शर्मा उपविजेती ठरली. आता मोनिका या वर्षाच्या अखेरीस थायलँडमध्ये होणाऱ्या 74 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. मनिका ही मूळची राजस्थानच्या श्रीगंगानगर इथली असून सध्या ती दिल्लीत राहते. दिल्लीतच ती राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयात पदवी पूर्ण करतेय. 23 वर्षीय मनिकाने 2024 मध्ये ‘मिस युनिव्हर्स राजस्थान’चा किताब पटकावून सौंदर्य स्पर्धेत दमदार पदार्पण केलं होतं. आता थायलँडमध्ये होणाऱ्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत ती 130 देशांच्या तरुणींना टक्कर देणार आहे.

‘मिस युनिव्हर्स इंडिया’च्या अंतिम फेरीत मनिकाला महिलांच्या शिक्षणाबाबत आणि गरीबांना मदत करण्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला होता. “जर तुला महिलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणं आणि गरीब कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत देणं यापैकी एक पर्याय निवडायचा असेल, तर तू कोणाला प्राधान्य देशील आणि का”, असा सवात तिला करण्यात आला. त्याचं उत्तर देताना मनिका म्हणाली, “या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत. महिलांना बऱ्याच काळापासून शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं आहे. याचा परिणाम गरीब कुटुंबांवर होत आहे. आपल्या लोकसंख्येपैकी अर्धी लोकसंख्या शिक्षणापासून दूर ठेवण्यात आली होती. शिक्षणामुळे त्यांचं आयुष्य बदलू शकलं असतं. जर मला निवड करायची असेल तर मी महिलांचं शिक्षण निवडेन. कारण शिक्षण केवळ एका व्यक्तीचंच नाही तर संपूर्ण पिढ्यांचं आणि समाजाचं भविष्य बदलू शकतं.”

मनिकाने केवळ सौंदर्यस्पर्धेतच बाजी मारली नाही, तर इतरही विविध क्षेत्रात तिने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिने परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या बिमस्टेक सेव्होकॉनमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलंय. ललित कला अकादमी आणि जेजे स्कूल ऑफ आर्ट्ससारख्या प्रतिष्ठित संस्थांनी तिला सन्मानित केलंय. त्याचसोबत ती एनसीसी पदवीधरसुद्धा आहे. मनिकाने शास्त्रीय नृत्याचंही प्रशिक्षण घेतलंय आणि तिने चित्रकलेमध्येही प्रभुत्व मिळवलं आहे.

मिस युनिव्हर्स इंडिया 2025 चा किताब जिंकल्यानंतर मनिका म्हणाली, “ही भावना खूप अद्भुत आहे. हा प्रवास खूप अद्भुत होता. मी माझ्या मार्गदर्शकांचे, शिक्षकांचे, पालकांचे, मित्रमैत्रिणींचे आणि कुटुंबीयांचे आभार मानू इच्छिते. भारताचं सर्वोत्तम पद्धतीने प्रतिनिधित्व करणं आणि मिस युनिव्हर्सचा मुकूट मायदेशी आणणं हेच माझं लक्ष्य आहे.”