
आर्यन खानच्या ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या वेब सीरिजमध्ये फ्रेडी सोडावालाची भूमिका साकारून प्रकाशझोतात आलेले अभिनेते मनिष चौधरी 2000 च्या सुरुवातीपासून बॉलिवूडमध्ये काम करत आहेत. परंतु सध्या ते त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मनीष यांनी त्यांच्या लव्हस्टोरीचा खुलासा केला. त्यांनी 17 वर्षांनी लहान श्रुती मिश्राशी लग्न केलंय. या लग्नासाठी दोन वर्षांपर्यंत श्रुतीच्या आईवडिलांची मनधरणी करावी लागल्याचं त्यांनी सांगितलंय. मनिष आणि श्रुती यांनी 2023 मध्ये लग्नगाठ बांधली.
‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत मनिष म्हणाले, “माझ्या विचारांशी आणि स्वभावाशी मिळतंजुळतं कोणीतरी मला मुंबईत भेटलं, याचा मला खूप आनंद आहे. मी सुरुवातीपासूनच ‘आय लव्ह यू’ असं बऱ्याचदा म्हणालोय. श्रुतीने तिच्या प्रेमाची कबुली देण्यासाठी थोडा वेळ घेतला.” दोघांच्या वयातील अंतराबद्दल श्रुतीने सांगितलं, “आमच्या वयात 17 वर्षांचं अंतर आहे. मी जेव्हा त्यांना विचारलं की, तुमचं वय काय आहे? तेव्हा त्यांचं उत्तर ऐकून मी थक्क झाले होते. आमच्या वयात अंतर असेल हे मला ठाऊक होतं, पण ते इतकं असेल याची मला कल्पना नव्हती.” हे ऐकून ‘वयाचा मुद्दा माझ्यासाठी कधीच अस्तित्त्वात नव्हता’, असं मत मनिष यांनी मांडलं.
मनिष आणि श्रुती यांच्यात वयाचं अंतर ही कधी समस्या बनलीच नाही. “आम्ही दोघं जेव्हा पहिल्यांदा बोलत होतो, तेव्हाच मी त्यांना सांगितलं होतं की, हे पहा.. मला वयाच्या अंतराविषयी काही देणंघेणं नाही. पण माझ्या मते आपल्याला बऱ्याच काळापर्यंत एकत्र राहावं लागेल. मी वयाची पर्वा करत नाही. पण तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त जगावं लागेल, कारण तुमच्याशिवाय मी एकही दिवस राहणार नाही”, अशा शब्दांत श्रुती व्यक्त झाली.
मनिष आणि श्रुती जरी लग्नासाठी तयार असले तर श्रुतीच्या आईवडिलांना हे नातं मंजूर नव्हतं. त्यांची मनधरणी करण्यासाठी दोघांना दोन वर्षांचा काळ लागला. “मी या व्यक्तीशी लग्न करणार आहे, हे माझ्या कुटुंबीयांना पटवून देण्यासाठी मला दोन वर्षे लागली. प्रत्येकाला मी शांतपणे सर्व गोष्टी समजावून सांगितल्या. कोविडदरम्यान त्यांनी मला काऊचवरून बसून विचारलं की, तू माझ्याशी लग्न करशील का? तेव्हा मी थक्कच झाले होते. हे खरंच प्रपोजल आहे का, असा प्रश्न मला पडला होता. त्यानंतर मी त्यांना होकार दिला. इतक्या साध्या आणि हलक्याफुलक्या पद्धतीने कोणीच आजवर कोणाला प्रपोज केलं नसेल”, असं श्रुतीने सांगितलं.