Katrina Kaif: कतरिनाची खिल्ली उडवा.. चॅनलवाल्यांनी सांगितलं; नकार देत अभिनेता स्पष्टच बोलला
Katrina Kaif: कतरिना कैफ आणि मनिष पॉल यांनी ‘तीस मार खान’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. अक्षय कुमारचीही या चित्रपटात प्रमुख भूमिका होती. या चित्रपटाच्या निमित्ताने दोघांची ओळख झाली आणि पुढे पुरस्कार सोहळे आणि विविध कार्यक्रमांमध्ये त्यांची भेट होत राहिली.

Katrina Kaif: बॉलिवूडमध्ये पुरस्कार सोहळे म्हणजे ग्लॅमर, मनोरंजन आणि कलाकारांमधील धमाल मस्ती. मात्र प्रेक्षकांना हसवण्याच्या नादात कधी कधी कलाकारांची खिल्लीसुद्धा उडवली जाते. विशेषतः एखाद्या कलाकाराला हिंदी बोलताना अडचण येत असेल, तर त्यावरून विनोद केले जातात. आता लोकप्रिय अभिनेता आणि टीव्ही होस्ट मनिष पॉल याने पुरस्कार सोहळ्यांच्या पडद्यामागचं असंच एक वास्तव उघड केलं आहे. अभिनेत्री कतरिना कैफच्या हिंदीची खिल्ली उडवण्यासाठी एका टीव्ही चॅनलकडून त्याच्यावर दबाव टाकण्यात आला होता. मात्र, मनिषने या सूचनेला स्पष्ट नकार दिला. एखाद्याला अपमानित करून प्रेक्षकांना हसवण्यापेक्षा स्वतःच्या शैलीत मनोरंजन करणं त्याला महत्त्वाचं वाटतं, असं त्याने सांगितलं.
मनिष पॉलने ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत हा अनुभव सांगितला. आपल्या होस्टिंगच्या सुरुवातीच्या काळात तो अनेक पुरस्कार सोहळे आणि मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करायचा. या कार्यक्रमांना कतरिना कैफही अनेकदा उपस्थित असायची. त्यावेळी तिची हिंदी बोलण्याची शैली हा विनोदाचा विषय बनवण्याचा प्रयत्न केला जायचा. “कतरिना माझ्या उपस्थितीत सहज वावरायची. कारण मी कधीही तिच्या हिंदीची खिल्ली उडवली नव्हती. एखाद्या व्यक्तीला भाषा व्यवस्थित बोलता येत नाही म्हणून तिला वारंवार तीच भाषा बोलायला लावणं किंवा तिची अडचण सर्वांसमोर आणणं, ही कल्पनाच मला आवडत नाही,” असं तो स्पष्ट शब्दांत म्हणाला.
पहा फोटो-
View this post on Instagram
मनिषने पुढे सांगितलं की, अनेकदा टीव्ही चॅनलकडून त्याला कतरिनाच्या हिंदीवर आधारित विनोदी प्रसंग सादर करण्यास सांगितलं जायचं. मात्र, त्याने प्रत्येक वेळी अशा सूचना नाकारल्या. प्रेक्षकांना हसवण्यासाठी एखाद्याला अस्वस्थ करणं किंवा त्याची खिल्ली उडवणं गरजेचं नाही, अशी त्याची भूमिका होती. चॅनलला तीन मिनिटं प्रेक्षकांना हसवायचं असेल, तर ते आपण आपल्या शैलीत करू शकतो, असं तो आयोजकांना सांगायचा. “विनोदामध्ये सर्जनशीलता असावी. एखाद्याला कमी लेखून किंवा त्याचा अपमान करून मनोरंजन करण्याची गरज नाही,” असं मत त्याने मांडलं.
कतरिना स्वभावाने मनमिळाऊ असल्याचं सांगताना मनीषने तिच्याबद्दल आदर व्यक्त केला. तिच्या हिंदीवर विनोद करून तिला अवघडल्यासारखं वाटू नये, याची तो जाणीवपूर्वक काळजी घ्यायचा. त्यामुळे त्यांच्या नात्यात केवळ व्यावसायिक ओळख नव्हती, तर एकमेकांबद्दल आदरही होता.
मनिषने या मुलाखतीत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. कलाकारांच्या ब्रेकअप, प्रेमसंबंध किंवा खासगी आयुष्यावरून विनोद करण्याच्या सूचनाही त्याला दिल्या जायच्या. मात्र, अशा गोष्टींचा वापर करून एखाद्याला सर्वांसमोर अडचणीत आणणं त्याला मान्य नव्हतं. एखाद्या कलाकाराच्या वैयक्तिक आयुष्यात काय सुरू आहे, याची संपूर्ण माहिती प्रेक्षकांना नसते. त्यामुळे केवळ मनोरंजनासाठी त्याच्या खासगी आयुष्यावर भाष्य करणं योग्य नाही, असं मला वाटतं, असं त्याने स्पष्ट केलं.
