मनीषा कोईरालाने स्वत:च्या ‘त्या’ सिनेमावर घेतला होता आक्षेप, केली बंदी घालण्याची मागणी

अभिनेत्री मनीषा कोईराला ही कायमच चर्चेत असते. तिने एकदा तर स्वत:च्या चित्रपटातील सीनवर आक्षेप घेतला होता. आता हा सिनेमा कोणता चला जाणून घेऊया...

मनीषा कोईरालाने स्वत:च्या त्या सिनेमावर घेतला होता आक्षेप, केली बंदी घालण्याची मागणी
manisha Koirala
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 02, 2025 | 7:06 PM

९०च्या दशकतात वेगवेगळ्या सिनेमांमध्ये काम करत, अभिनयाच्या जोरावार प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे मनीषा कोईराला. आज तिचे नाव बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत घेतले जाते. मनीषा ही कायम तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. एकदा तर मनीषाने स्वत:च्या चित्रपटातील एका सीनवर आक्षेप घेतला होता. तिने तो सीन काढून टाकण्याची मागणी थेट दिग्दर्शकाकडे केली होती. चित्रपटाच्या दिग्दर्शकाने स्वत: याविषयी खुलासा केला होता.

मनीषा कोईरालाचा ‘एक छोटी सी लव्ह स्टोरी’ हा चित्रपट २००२ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामुळे अभिनेत्री मोठ्या चर्चेत आली होती. या शॉर्ट फिल्ममध्ये मनीषासोबत १४ वर्षीय आदित्य सीलने काम केले होते. पण या चित्रपटाती सीनवर मनीषाने आक्षेप घेतला होता. हे सीन मनीषाच्या ड्युप्लिकेटबरोबर शूट करण्यात आले होते. हे सीन हटवण्यासाठी मनीषाने दिग्दर्शकाकडे विनंती केली होती. पण दिग्दर्शकाने नकार देताच तिने न्यायालयात धाव घेतली होती.

‘एक छोटी सी लव्ह स्टोरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन के. शशिलाल नायर यांनी केले होते. त्यांनी नुकताच ‘फ्रायडे टॉकिज’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी या चित्रपटासाठी मनीषाचे कास्टिंग कसे झाले याविषयी सांगितले आहे. ते म्हणाले की, “एक छोटी सी लव्ह स्टोरी या चित्रपटासाठी मला नवीन चेहरा हवा होता. कोणीतरी अशी मुलगी हवी होती जी मॉडेलसारखी दिसेल. मला या चित्रपटात शरीराने बारीक असणारी मुलगी हवी होती. मी मनीषाला याबद्दल सांगितले, तेव्हा तिने मला म्हटले की, मी वजन कमी करेन, जीममध्ये जाईन, व्यायाम करेन. तिने हेसुद्धा म्हटले होते की, या चित्रपटात काम करण्यासाठी मी मानधनही घेणार नाही. ती हे सगळे बोलल्यानंतर मी तयार झालो. मी तिला वजन कमी करण्यासाठी दोन महिने दिले होते. तरी देखील तिने वजन कमी केले नाही.”

पुढे ते म्हणाले की, “आम्ही चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली. पहिल्या दिवशी ती जेव्हा सेटवर आली तेव्हा तिला पाहून मी नाराज झालो. तिचे वजन खूप जास्त होते. त्यामुळे तो चित्रपट कसा बनवणार असा प्रश्न आम्हाला पडला होता. मी तिच्यासोबत चर्चा केली. चित्रपटात एक मुलगा एका मुलीचा पाठलाग करतो, असे सीन होते. जर कोणी असे करत असेल, तर त्या मुलीने तसे दिसायला हवे. मनीषा जशी त्यावेळी दिसत होती, ती त्या प्रकारचे सीन कसे करू शकणार होती? जेवणाच्या ब्रेकमध्ये आमची खूप मोठी मीटिंग झाली. आम्ही ठरवले की, जे क्लोजअपचे शॉट असतील तिथे मनीषाचे शॉट घेऊ आणि जे लांबून दिसणार होते, तिथे तिच्या ड्युप्लिकेटचा वापर करून शूटिंग करू. मला मनीषाला नाराज करायचे नव्हते किंवा घरी जा असे म्हणायचे नव्हते. मनीषानेसुद्धा खूप मदत केली.”

काय होता मनीषाचा आक्षेप?

मनीषाने या चित्रपटाच्या वेळी ‘टाइम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये मनीषाने तिला या चित्रपटातील ड्युप्लिकेटचे सीन्स आवडले नसल्याचे सांगितले होते. “जे ड्युप्लिकेटबरोबर सीन होते ते काढवेत अशी माझी इच्छा होती. चित्रपटाचे पोस्टर देखील अतिशय आक्षेपार्ह होते. तसेच चित्रपट सगळीकडे नफा कमवत असेल तर मी माझे मानधन का घेऊ नये. मला नफ्यामधील वाटा हवा होता” असे मनीषा म्हणाली.