प्रिया मराठेनंतर ‘मुरांबा’ मालिका फेम अभिनेत्याचं निधन? पोस्टवर संतापला कलाकार
अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनाच्या वृत्तातून मराठी कलाविश्व सावरत असतानाच आणखी एका प्रसिद्ध कलाकाराच्या निधनाची पोस्ट समोर आली. परंतु यावरून आता तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नेमकं काय प्रकरण आहे, जाणून घेऊयात..

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन झालं. वयाच्या 38 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. प्रियाच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली होती. या दु:खद बातमीतून कलाविश्व बाहेर येत नाही तोच आणखी एका मराठी कलाकाराच्या निधनाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. प्रिया मराठेसोबत या अभिनेत्याचा फोटो पोस्ट करत ‘मराठी सिनेविश्वातील दोन कलाकार गमावले’ असं त्यावर लिहिलण्यात आलं. युट्यूबवरील व्हिडीओच्या थंबनेलला दोघांचा फोटो वापरण्यात आला. हा फोटो होता ‘मुरांबा’ मालिकेत भूमिका साकारणारा अभिनेता अभिजीत चव्हाण यांचा. युट्यूब व्हिडीओच्या थंबनेलवरील दोघांचा फोटो आणि त्यावरील निधनाचा मजकूर वाचून अभिजीत चव्हाणने प्राण गमावले की काय, अशी भीती चाहत्यांमध्ये निर्माण झाली होती. परंतु व्हिडीओच्या आतीत कंटेंट वेगळाच होता. अशा खोट्या बातमीवर अभिनेत्याने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
नेमकं काय झालं?
युट्यूबवर कलाकारांच्या बातम्यांचे अनेक व्हिडीओ पोस्ट केले जातात. त्यावर भरभरून व्ह्यूज मिळवण्यासाठी अनेकदा व्हिडीओच्या थंबनेलवर चुकीची किंवा नेटकऱ्यांना आकर्षित करणारी माहिती दिली जाते किंवा तसा फोटो लावला जातो. तो फोटो पाहून नेटकरी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करतात आणि आत वेगळाच कंटेंट असतो. अशाच पद्धतीचा हा व्हिडीओ अभिजीत चव्हाण यांच्याबद्दल बनवण्यात आला. खरं तर व्हिडीओच्या आत कंटेंट प्रिया मराठे आणि आशिष वारंग या दोन कलाकारांच्या निधनाबाबतचा होता. परंतु थंबनेलवर प्रियासोबत अभिजीत चव्हाण यांचा फोटो वापरण्यात आला. त्यावरून त्यांच्या निधनाची अफवा पसरल्या. यावरून अभिजीत यांनी पोस्ट लिहित संताप व्यक्त केला.
अभिजीत यांची पोस्ट-
युट्यूब व्हिडीओच्या थंबनेलचा फोटो पोस्ट करत त्यांनी लिहिलं, ‘माझ्या मृत्यूची बातमी मला पाहायला मिळाली.. अजून काय पाहिजे.. आता काय करायचं यांचं?’ अभिजीत यांच्या या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘ही अत्यंत अमानुष कृती आहे. अशा पद्धतीने एखाद्या जिवंत व्यक्तीच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवणं अक्षम्य आहे’, असं एकाने लिहिलं. तर यावर कारवाई व्हावी, अशी मागणी काहींनी केली आहे.
