कुणी तरी येऊन सांगितलं… चला हिंदूंना मारायला… मुस्लमानांना…; किरण मानेची नागपूर दंगलीवरून टीका

एका मराठमोळ्या अभिनेत्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत नागपूरमध्ये झालेल्या दंगलीवर प्रतिक्रिया दिली आहे.

कुणी तरी येऊन सांगितलं... चला हिंदूंना मारायला... मुस्लमानांना...; किरण मानेची नागपूर दंगलीवरून टीका
Kiran Mane
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 18, 2025 | 6:41 PM

महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरुन सुरु असलेल्या वादाला काल हिंसक वळण आले. याच मुद्यावरुन नागपूरच्या महाल भागात सोमवारी रात्री दोन गटात तुफान राडा झाला. दोन्ही बाजूंकडून दगडफेक, वाहनांची तोडफोड, वाहन पेटवून देण्याचे प्रकार घडले. अनियंत्रित जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. दगडफेक करणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करताना पोलीसही जखमी झाले. हा पूर्वनियोजीत कट असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. दरम्यान एका मराठमोळ्या अभिनेत्याने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

नागपूर दंगलीवर प्रतिक्रिया देणारा हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून शिवसेना उबाठा गटाचा समर्थक किरण माने आहे. त्याने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने ‘दंगली या ठरवून घडवल्या जातात. सत्ताधाऱ्यांचे कारस्थान आहे’ असे म्हणत टीका केली आहे.

वाचा: केदार शिंदे कडून ही अपेक्षा नव्हती, फक्त छपरी पोर…; सूरज चव्हाणच्या ‘झापूक झूपूक’चा व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण

काय म्हणाला किरण माने?

‘दंगल आपोआप घडत नाही दंगल घडवून आणली जाते. कुणाच्या तरी फायद्यासाठी ती दंगल घडवून आणली जाते. आपण सगळे मध्यमवर्गीय. मला सांगा आपण सगळे मध्यमवर्गीय, आपण सगळे बसलोय गप्पा मारत आईशी मुलांशी आणि कुणीतरी येऊन सांगितलं की चला चला दंगल करायची. हिंदूंना मारायला, मुसलमानांना मारायला आपण जाऊ का ? अशी दंगल आपोआप घडत नाही ती ठरवली जाते. काह मुलांची माथी भडकवली जातात. त्यात काही भाडोत्री गुंड मिक्स करतात आणि ती दंगल घडवून आणली जाते. त्यामागे खूप मोठा प्लॅन असतो’ असे किरण माने म्हणाला.

पुढे तो म्हणाला की, ‘अचानक नाही घडत हे. त्यामुळे आपण जातीने आपल्या मुलांवर लक्ष ठेवलं पाहिजे. विशेषतः ज्यांच्या घरात तरुण मुलं आहेत त्यांनी बघितलं पाहिजे आपल्या मुलांना कुणी भडकवत तर नाही ना. आपला खरा इतिहास त्यांना सांगितला पाहिजे, आपल्या महामानवाचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवले पाहिजेत. आम्ही लहान असताना मुलं बाहेर जाऊ नयेत म्हणून धरीबाबा आलाय म्हणजे बागुलबुवा आलाय असं सांगायचे. असे अनेक धरीबाबा गावोगावी फिरतायत तरुण मुलांना खोटा इतिहास सांगून भडकवत आहेत. त्याच्यावर लक्ष ठेवा.’

किरण मानेने हा व्हिडीओ त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत, ‘दंगल ही आपोआप घडत नाही, तर ती घडवून आणली जाते…! सगळीकडे द्वेषाचं विष पसरवूनही सलोख्याची भूमी नासत नाही, डाव जिंकता येत नाही… हे पाहून हतबल झालेल्यांनी होमग्राऊंडवर खेळलेला हा रडीचा डाव आहे. यातूनही त्यांना हवं ते मिळणार नाहीच… जय शिवराय… जय भीम !’ असे कॅप्शन दिले आहे.