
मुंबई शहरात अनेकजण करिअरसाठी येतात. इथं भाड्याने राहतात. परंतु अनेकदा भाड्याने घर मिळवताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मराठी अभिनेत्री पूजा कातुर्डेला सध्या अशाच समस्यांना सामोरं जावं लागत आहे. यासंदर्भात तिने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहित संताप व्यक्त केला आहे. अभिनेत्री आहे आणि सिंगल आहे म्हणून तिला घर नाकारलं जात आहे. अखेर वैतागून तिने सोशल मीडियावर ही पोस्ट लिहिली असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
‘माझ्या जुन्या मालकाने फ्लॅट विकला. नवीन घराच्या शोधात निघाले. हाऊसिंग, 99 एकर्स, ब्रोकर, परिसर.. सगळीकडे फोन, फ्लॅट पाहिले. वेळ, एनर्जी सगळं दिलं. शेवटी 1-2 फ्लॅट्स फायनल केले. पण काय झालं? मालक डिटेल्स घेतो आणि अचानक उत्तर येतं- ओह नो, ॲक्टर नको आहे. त्यात महिला ॲक्टर? म्हणजे फिमेल ॲक्टर असल्यामुळे घर नाकारलं जातं? दुसऱ्या ठिकाणी गेले, तिथे दुसऱ्या मालकाने ‘हो’ म्हटलं, पण जेव्हा बिल्डरकडून डिटेल्स मागवले, तेव्हा बिल्डर म्हणतो- सिंगल आहे? ॲक्टर आहे? मग नाहीच. अजून एके ठिकाणी सोसायटी कमिटीच्या ‘बुद्धिमान’ सदस्यांना माझं ॲक्टर असणं इश्यू वाटतं’, असं तिने लिहिलंय.
‘म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे? अभिनेत्री म्हणजे गोंधळ? सिंगल म्हणजे संशयास्पद? तुम्ही आम्हाला बघता फक्त टीव्हीवर, स्क्रीनवर. पण खऱ्या आयुष्यात आम्हाला नाकारता, कारण आम्ही ॲक्टर आहोत. तुमच्या सोसायटीत पती-पत्नी एकमेकांवर ओरडतात, केससुद्धा चालू असतात. पण प्रॉब्लेम आहे ॲक्टर्समध्ये? काय भोंदू विचार आहेत हे? तुमच्या सोसायटीमध्ये मुली नाहीत का? कोण राहिलं नाही का स्वत:चं करिअर करत? मुंबईसारख्या शहरातही अजून स्टीरिओटाइप? काय शरम वाटत नाही? मग कुठे राहावं आम्ही? काय वाटतं तुम्हाला? ॲक्टर म्हणजे नाचणारे-गाणारे? म्हणजे गोंधळ? म्हणजे बदमाश? म्हणजे कॅरेक्टरलेस?’ असा सवाल पूजाने केला आहे.
याविषयी राग व्यक्त करत तिने पुढे लिहिलंय, ‘मालकाला ॲक्टर नको, बिल्डरला सिंगल नको. तुम्ही कोण आहात ठरवणारे आम्ही कुठे राहायचं ते? भाडं वेळेवर देणारी व्यक्ती नको, कारण ती महिला आहे, एकटी राहते आणि कलाकार आहे. म्हणजे एवढंच का कमी पाप? घर विकायचंय, भाड्याने द्यायचंय.. पण जजमेंटसह. तुमच्या घरात सगळे व्यवस्थित लग्न करून, नोकरी करूनच राहतायत का? शर्म वाटली पाहिजे असा भेदभाव करताना. मी घर शोधतेय आणि घर नाकारलं जातं. कारण मी स्वावलंबी आहे, स्वतंत्र आहे आणि स्वप्नांवर जगते. मग सांगा.. लग्न करून येऊ? घर देणार का मग?’
‘मी अभिनेत्री आहे, सिंगल आहे, स्वतंत्र आहे. कोणालाही भीक नाही मागत. पैसे देऊन घर हवं आहे.. दया नको’, असं पूजाने पोस्टच्या अखेरीस लिहिलं आहे.
पूजाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘अगं काय सांगू, पुण्यात पण हेच आहे’, असं एका युजरने लिहिलंय. तर ‘ॲक्टर्स पण माणसच असतात. या पोस्टला पाठिंबा द्या’, असं दुसऱ्याने म्हटलंय.