जेव्हा वडिलांच्या विरोधाला न जुमानता नागराजने घरी आणला बाबासाहेबांचा फोटो, वाचा हृदयस्पर्शी किस्सा…

आयेशा सय्यद, Tv9 मराठी

Updated on: Mar 13, 2022 | 8:30 AM

पहिल्यांदा जेव्हा नागराज मंजुळे यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आपल्या घरी आणला, तेव्हा नेमकं काय घडलं? याबाबत आपण जाणून घेऊयात...

जेव्हा वडिलांच्या विरोधाला न जुमानता नागराजने घरी आणला बाबासाहेबांचा फोटो, वाचा हृदयस्पर्शी किस्सा...
बाबासाहेब आंबेडकर, नागराज मंजुळे

मुंबई : नागराज मंजुळे (Nagraj Manjule) बस्स नाम ही काफी है… नागराज मंजुळे यांनी मराठी सिनेसृष्टीला करोडोंचा गल्ला जमवण्याचं स्वप्न दाखवलं. नागराज नावात जादू आहे. त्यांच्या सिनेमात हिरो कुणी असो, पण पडद्यामागे काम करूनही पडद्यावर ठसठशीत उठून दिसतात ते नागराजच… नागराज यांनी सर्वसामान्य माणसाला हिरो केलं. त्याचे सिनेमे तुमच्या-माझ्या जगण्याची गोष्ट सांगतात. सिनेमा संपताना उगीच ओढून-ताणून करून काहीतरी वेगळं दाखवण्याचा अट्टहास नसतो. तर सहज कृतीतून कायम मनावर कोरला जाईल, असा संदेश ते देतात. सध्या नागराज यांचा ‘झुंड(Jhund) बॉक्सऑफिस गाजवतोय. याच सिनेमातील एक फोटो खूप चर्चेत राहिला. अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांच्या समोर बाबासाहेबांचा एक फोटो असणारा, एक फोटो व्हायरल झाला. या फोटोने सोशल मीडियावरचं आपलं स्थान पक्कं केलेलं असताना नागराज मंजुळे यांना बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काय वाटतं. पहिल्यांदा जेव्हा त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा (Babasaheb Ambedkar) फोटो आपल्या घरी आणला, तेव्हा नेमकं काय घडलं? याबाबत आपण जाणून घेऊयात…

झुंडमधला हा फोटो पाहून अनेकांना नागराजच्या मनातील बाबासाहेब आंबेडकर यांचं स्थान काय आहे?, असा प्रश्न पडला. नागराज यांनी एका मुलाखतीत याचं उत्तर दिलं होतं. “मला किंवा माझ्या घरातल्या माणसांना बाबसाहेब आंबेडकर माहित नव्हते. दहावी झाल्यानंतर मला आंबेडकर कळू लागले. बाळू बनसोडे नावाचा माझा मित्र आहे. त्याच्याकडून मला बाबासाहेब समजू लागले. त्याने मला सांगितलं की बाबासाहेबांची हालाकीची परिस्थिती असताना ते कसे शिकले, ते इतरांनाही कसं शिकण्यासाठी प्रोत्साहित करायचे वगैरे…”, असं नागराज यांनी या मुलाखतीत सांगितलं होतं. “हळूहळू मला बाबासाहेब आणि माझ्यातलं नातं स्पष्ट व्हायला लागलं. मला वाटायचं की मी बाबासाहेब आहे…”, असंही नागराज यांनी या मुलाखतीत सांगितलं.

नागराजने बाबासाहेबांचा फोटो घरी आणला

नागराज यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घरात लावल्याचाही किस्सा या मुलाखतीत सांगितला. “बारावीत असताना मी बाबासाहेबांचा फोटो घरात लावायचं ठरवलं. देवाच्या फ्रेममधला देवाचा फोटो काढला आणि त्या फ्रेममध्ये बाबासाहेबांचा फोटो लावला. हा फोटो लावल्यामुळे माझ्या वडिलांसोबत माझं 15-20 दिवसांपेक्षा जास्त दिवस भांडण झालं”, असं नागराज यांनी सांगितलं.

“वडिल म्हणायचे महाराचा फोटो आपल्या घरात कशाला लावलास? पण मग मी माझ्या वडिलांशी खूप भांडलो. मी त्यांना म्हणालो की तुम्ही जर बाबासाहेबांचा फोटो काढला तर मी देवाचे सगळे फोटो फेकून देईल… पण मग मी पुस्तक वाचून बाबासाहेबांचे विचार वडिलांना सांगितले. बाबासाहेबांनी या या गोष्टी केल्या, असं सांगितलं. त्यांच्यामुळे झालेले बदल सांगितले. त्यांच्यामुळे शाळेतली फी माफ होते. आधी तुम्ही गाडग्यात जेवायचा आता तसं होत नाही. ही सगळी बाबासाहेबांची कृपा आहे. पण तरीही ते म्हणायचे. सगळं खरं आहे, पण जात जात असते. लोकांना आपलं घर महाराचं आहे असं वाटेल, असं वडील सांगायचे. मग मी त्यांना समजावलं की कुणाला काहीही वाटू द्या… आपल्या घरात बाबासाहेबांचा फोटो हवाच! असं करत-करत मी त्यांना समजवलं आणि मग मी खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे विचार समजून घेतले”, असं नागराज यांनी या मुलाखतीत सांगितलं.

सध्या नागराज यांच्या मनात बाबासाहेबांचं काय स्थान आहे हे झुंडमधील एका सीनने दाखवून दिलं. ज्याला प्रेक्षकांनीही चांगलीच दाद दिली.

संबंधित बातम्या

‘काढण्यासारखं थोडं काही, वेचण्यासारखं खूप काही’; ‘झुंड’बाबत ‘धुरळा’च्या लेखकाची पोस्ट चर्चेत

‘जात.. जात नाही तोवर…’; नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’वर टीका करणाऱ्यांना केदार शिंदेंचं सडेतोड उत्तर

‘नागराज मंजुळे भावा.. त्या ओळी मनातून जातच नाहीत’; ‘झुंड’साठी सिद्धार्थने लिहिलेली पोस्ट वाचली का?

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI