Marathi Movie : पारितोषिक विजेत्या चित्रपटांचा हुकमी संकलक, निलेश गावंड यांच्या कामाचं सर्वत्र कौतुक
राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमध्ये निलेश गावंड यांनी संकलित केलेल्या अनेक चित्रपटांनी बाजी मारली आहे. त्यांनी संकलित केलेल्या चित्रपटांच्या यशाचा हा प्रवास नक्कीच कौतुकास्पद आहे.

मुंबई : ‘लेखकाच्या आणि ‘संकलकाच्या टेबलवर’ चित्रपट खऱ्या अर्थाने घडतो असं म्हणतात. चित्रपट चांगला होण्यात महत्त्वाचा वाटा संकलकाचाही असतो. संकलन म्हणजे केवळ तांत्रिक प्रक्रिया असा अनेकांचा समज असतो. मात्र संकलकाकडे सर्जनशीलता असणे गरजेचे असते. याच सर्जनशीलतेच्या जोरावर संकलक निलेश गावंड (Nilesh Gawand) यांनी चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवला आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमध्ये त्यांनी संकलित केलेल्या अनेक चित्रपटांनी बाजी मारली आहे. त्यांनी संकलित केलेल्या चित्रपटांच्या (Marathi Movie) यशाचा हा प्रवास नक्कीच कौतुकास्पद आहे.
‘श्वास’ चित्रपटाच्या वेळी ‘सह-संकलक’ म्हणून सुरु झालेला हा प्रवास नुकत्याच जाहीर झालेल्या ‘फनरल’ चित्रपटाच्या राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत सातत्याने सुरु आहे. श्वास, बाबांची शाळा, धग, भोंगा, फनरल या चित्रपटांना मिळालेल्या राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारांच्या यशामध्ये निलेश गावंड यांच्या संकलनाचाही मोलाचा वाटा आहे. आपण संकलित केलेल्या चित्रपटांना सातत्याने मिळणारी यशाची पावती आपल्यासाठीही मोलाची असल्याचे ते सांगतात. नवीन काम अधिक जोमाने करण्यासाठी या पुरस्कारांमुळे प्रेरणा मिळते, असं ते सांगतात.
निलेश गावंड आज तेवीस वर्ष संकलन क्षेत्रात आहेत. 1999 मध्ये प्रकाश मेहरा प्रोडक्शनमधून आपल्या करिअरची सुरुवात करत अनेक मालिका, चित्रपट, डॉक्युमेंटरी, जाहिराती त्यांनी संकलित केल्या. 50हून अधिक नावाजलेल्या दिग्दर्शकांसोबत त्यांनी आजवर काम केले आहे. गोवा आणि गुजरात सरकारचे उत्कृष्ट संकलनासाठीचे पुरस्कार त्यांना मिळाले असून नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रानबाज़ार’ या लोकप्रिय वेबसीरीजचं संकलनही निलेश गावंड यांनी केलं आहे.
सध्याच्या उत्कृष्ट संकलकांच्या यादीत निलेश गावंड यांचे नाव आवर्जून घेतले जाते. संकलनाच्या कलेविषयी ते म्हणतात, ‘संकलन म्हणजे दर दिवशी एक वेगळं आव्हान असतं. संकलन हे खूप जिकीरीचं, वेळखाऊ, किचकट आणि पेशन्सचंही काम आहे. या कामावर माझी निष्ठा आहे, यामुळेच मी यात संपूर्णपणे समरस झालो आहे. माझ्यासाठी हे क्षेत्र अगदी आवडीचं आहे. राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कारांमध्ये मी संकलित केलेल्या चित्रपटांना मिळालेलं यश मला समाधान देणारं असलं तरी संकलनाच्या माझ्या या प्रवासात मला अजून मोठा पल्ला गाठायचा आहे, असे ते नम्रपणे सांगतात.
