Video: ‘ती’चा लढा, ‘ती’च्या अस्तित्वासाठी..‘वाय’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

| Updated on: Jun 13, 2022 | 6:01 PM

यात मुक्ता बर्वे ही एका शासकीय अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत असून ती कार्यरत असलेल्या क्षेत्रात काही धक्कादायक गोष्टी घडत आहेत. या घटना दर महिन्याच्या अखेरच्या शुक्रवारी का घडत आहेत?

Video: तीचा लढा, तीच्या अस्तित्वासाठी..‘वाय’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित
Mukta Barve and Prajakta Mali
Image Credit source: Youtube
Follow us on

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या चर्चेत असलेला आणि अभिनेत्री मुक्ता बर्वेची (Mukta Barve) प्रमुख भूमिका असलेला चित्रपट म्हणजेच ‘वाय’ (Y)! कन्ट्रोल -एन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन अजित सूर्यकांत वाडीकर यांनी केले आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर झळकला असून यात हायपर लिंक थरार अनुभवायला मिळत आहे. ही संकल्पना मराठीत पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. येत्या 24 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या ‘वाय’ या शब्दामागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे. ही आपल्या सर्वांच्या अस्तित्वाची, अस्तित्वासाठीच्या संघर्षाची कहाणी आहे, जी सत्य घटनांवर आधारित आहे. ‘वाय’चा पहिला लूक समोर आल्यापासूनच चित्रपटाबद्दल अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उपस्थित झाले होते. त्याच प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आता ‘वाय’चा ट्रेलर (Trailer) प्रदर्शित झाला आहे.

यात मुक्ता बर्वे ही एका शासकीय अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत असून ती कार्यरत असलेल्या क्षेत्रात काही धक्कादायक गोष्टी घडत आहेत. या घटना दर महिन्याच्या अखेरच्या शुक्रवारी का घडत आहेत? या घटनांमागे काही दृश्य आणि अदृश्य हात आहेत; ज्यातील काही मदतीसाठी आहेत तर काही घात करणारेही आहेत. या सर्व गोष्टींचा शोध घेताना मुक्ता दिसत आहे. यात तिला यश मिळणार की तिचा हा शोध अपूर्णच राहणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ‘वाय’ पाहिल्यावर मिळणार आहेत. या चित्रपटात मुक्तासोबत प्राजक्ता माळी, नंदू माधव, ओमकार गोवर्धन, रसिका चव्हाण, सुहास शिरसाट, संदीप पाठक अशा नामवंत कलाकारांसोबत रोहित कोकाटे, संदीप दंडवते, प्रदीप भोसले यांच्याही भूमिका आहेत.

हे सुद्धा वाचा

पहा ट्रेलर-

‘वाय’ चे दिग्दर्शक अजित सूर्यकांत वाडीकर म्हणतात, “ही एक वास्तववादी कथा आहे. आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना घडत असतात, मात्र आपण त्यापासून अनभिज्ञ असतो. ‘वाय’च्या निमित्ताने हे भयाण वास्तव प्रेक्षकांच्या समोर आणण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. ‘वाय’ बघून प्रेक्षक अंतर्मुख होऊन नक्कीच विचार करायला लागतील, अशी आशा व्यक्त करतो.”